Social

भोकर येथील दूषित पाणीपुरवठ्यावर संताप; तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

भोकर येथील दूषित पाणीपुरवठ्यावर संताप; तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांना निवेदन; स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याची मागणी

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांना निवेदन सादर केले. या समस्येवर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला.

आरोग्याचा गंभीर प्रश्न

निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट परिसर, कोळीवाडा, गुजरवाडा, बडगुजरवाडा, चांभारवाडा, दर्जाचा वाडा, कुणबीवाडा, डेबूरवाडा, मांगवाडा तसेच हरिहर महाराज मंदिर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो, टायफॉइड आणि काविळीसारख्या आजारांचा धोका वाढल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

उपाययोजनांची मागणी

पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी, मुख्य जलवाहिनीची तपासणी करून गळती किंवा गटाराचे पाणी मिसळत असल्यास ती तातडीने दुरुस्त करावी, तसेच पाण्याचे योग्य शुद्धीकरण करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत प्रशासनाने टँकरद्वारे किंवा अन्य माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.

२४ ते ४८ तासांचा अल्टिमेटम

समस्येवर पुढील २४ ते ४८ तासांत ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन तसेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनावेळी उपस्थिती

निवेदन देताना प्रा. भाऊसाहेब सोनवणे, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाने, कविता बाविस्कर, चंद्रभागा कोळी, समाधान सपकाळे, धनराज वारडे, सुकदेव बाविस्कर यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button