मुलीला वाचवताना पित्याचा हृदयद्रावक मृत्यू… रावेर तालुक्यात तासखेडा येथे काळजाला चटका लावणारी घटना

मुलीला वाचवताना पित्याचा हृदयद्रावक मृत्यू… रावेर तालुक्यात तासखेडा येथे काळजाला चटका लावणारी घटना
रावेर (प्रतिनिधी) :मुलीवर संकट कोसळताना बापाची धाव… आणि त्या वाचविण्याच्या धडपडीत स्वतःचा प्राण अर्पण करणारा एक बाप… अशी काळजाला चटका लावणारी हृदयद्रावक घटना रावेर तालुक्यातील तासखेडा येथे गुरुवारी (१३ जून) सकाळी सहाच्या सुमारास घडली. विजेच्या थरारक धक्क्याने चिमुकलीचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात तिचे वडीलही मृत्युमुखी पडले.
या दुर्दैवी घटनेत समाधान कोळी (वय ३६) आणि त्यांची चिमुकली मुलगी मानवी समाधान कोळी (वय ९) या दोघांचा मृत्यू झाला. समाधान कोळी हे केळी व्यवसाय करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होते.
गुरुवारी सकाळी, घरासमोर चिमुकली मानवी खेळत असताना तिला अचानक उघड्या वीजवाहक तारांचा स्पर्श झाला. विजेच्या जोरदार धक्क्याने ती जागेवरच कोसळली. आपल्या लाडक्या लेकीला असं धडपडताना पाहून वडील समाधान तायडे धावत गेले. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव पणाला लावला. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि पाहता पाहता पित्यापुत्रीच्या साऱ्या आशा एकाच क्षणात मातीमोल झाल्या.
घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून, तासखेडा गाव स्तब्ध झाला आहे. दोघांना तत्काळ भुसावळच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
आज एका पित्याने आपल्या लेकीसाठी प्राण अर्पण केल्याचा जिवंत उदाहरण संपूर्ण गावाच्या काळजाला चिरत गेलं आहे.