
धरणगावमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!
ग्रामविकास अधिकाऱ्याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
धरणगाव (प्रतिनिधी) –तालुक्यात लाच मागणाऱ्या दोन कंत्राटी कार्यक्रम अधिकाऱ्यांना जळगावच्या एसीबी पथकाने 21 रोजी दीड हजारांची लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असताना आज 22 रोजी पुन्हा 25000 ला मागण्याचा प्रकार उघडकीस आला असून धरणगाव तालुका लाचखोरीचा अड्डा बनल्या असल्याची प्रतिक्रिया तालुका वासियांमध्ये व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत कामांच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या लालची हातांना अखेर बेड्या पडल्या! धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७, रा. खर्दे बुद्रुक) यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे
तक्रारदाराने गावात २ लाख ७० हजार रुपयांचे गटारी आणि इतर बांधकाम पूर्ण केले होते. बिल मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक ब्राम्हणे यांनी १,९५,००० व ६९,००० असे दोन धनादेश तयार केले आणि २ लाख ६४ हजार रुपये तक्रारदाराच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
मात्र, बिल मंजुरीचे सोंग करत ग्रामसेवकाने कामाच्या रकमेच्या १० टक्के म्हणजेच तब्बल २७ हजारांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजारांवर ठरली आणि ती त्वरित आणण्याचा तगादा सुरू झाला
तक्रारदाराने या प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे दिली. अधिकाऱ्यांनी शनिवार, २२ मार्च रोजी पडताळणी केली आणि नियोजनानुसार तक्रारदाराने ग्रामसेवकाला लाच देण्यासाठी बोलावले
या कारवाईत पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या घटनेनंतर खर्दे बुद्रुक परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक ग्रामस्थ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर टीका करत आहेत.
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर धडक कारवाई होत असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.