Other

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त मुक्ताई भवानी परिसरात व्याघ्र संवर्धनाची जनजागृती; महाराष्ट्रासह गुजरातमधील १३८ व्याघ्रदूतांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त मुक्ताई भवानी परिसरात व्याघ्र संवर्धनाची जनजागृती; महाराष्ट्रासह गुजरातमधील १३८ व्याघ्रदूतांचा उत्स्फूर्त सहभाग

रॅली, पथनाट्य, जैवविविधता अभ्यास, पक्षी निरीक्षण आणि गावागावांत दिंडीद्वारे व्याघ्र संवर्धनाचा संदेश

जळगाव | प्रतिनिधी

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन्यजीव संरक्षण संस्था, टायगर कोंझर्वेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबई, वनविभाग जळगाव आणि वनविभाग यावल यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताई भवानी प्रस्तावित अभयारण्य परिसरात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात जळगाव, नाशिक, नांदगाव, ठाणे, वाशीम, मुंबई, अकोला, अमरावती, यवतमाळ तसेच गुजरात येथून आलेल्या तब्बल १३८ व्याघ्रदूतांनी सहभाग नोंदविला.

भवानी मंदिरातून रॅलीला हिरवा झेंडा

चारठाणा येथील भवानी मंदिर वनक्षेत्रातून व्याघ्र जनजागृती रॅलीचे उद्घाटन टायगर कोंझर्वेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक प्रसाद हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डोलारखेडा वनपाल ललित गवळी, चारठाणा वनपाल मराठे मॅडम, बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, संजय खैरनार आणि विनोद ढगे उपस्थित होते.

शाळा-महाविद्यालयांत पथनाट्याद्वारे जनजागृती

रॅलीनंतर चारठाणा, कुऱ्हा व डोलारखेडा परिसरातील लक्ष्मीनारायण चौधरी आश्रमशाळा, माधव सदाशिव गोळवलकर महाविद्यालय, अशोक फडके माध्यमिक विद्यालय, शिवाजी हायस्कूल आणि ग. स. पाटील विद्यालय येथे विनोद ढगे यांच्या पथनाट्य पथकाने “वाघ वाचवा” या विषयावरील प्रभावी पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचा सुमारे २,००० विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

गावागावांत दिंडीद्वारे व्याघ्र संवर्धनाचा संदेश

चारठाणा, कुऱ्हा, काकोडा, डोलारखेडा, महालखेडा, इच्छापूर आणि निमखेडी या गावांमध्ये जनजागृती दिंडी काढून माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

मानवी वाघ ठरले आकर्षण

कार्यक्रमात हेमराज सपकाळे आणि दीपक महाले यांनी साकारलेल्या ‘मानवी वाघ’च्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी या मानवी वाघांसोबत नृत्य करत व्याघ्र संवर्धनाचा संदेश आनंदाने स्वीकारला.

मुक्ताई भवानीच्या जैवविविधतेचा अभ्यास

२८ जुलै रोजी सायंकाळी आयोजित अरण्यवाचन कार्यक्रमात पक्षी व वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, सतीश कांबळे आणि योगेश गालफाडे यांनी सहभागी व्याघ्रदूतांना मुक्ताई भवानी वनक्षेत्रातील समृद्ध जैवविविधतेची शास्त्रीय माहिती दिली.

बाळकृष्ण देवरे यांनी वन्यप्राण्यांच्या पगमार्क आणि विष्ठेच्या आधारे प्राण्यांची ओळख कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. तर राहुल सोनवणे यांनी नांद्रुक, बेहडा, सालयी, धावडा, बिजा, खिरणी, अर्जुन, खैर आदी वृक्षांची शास्त्रीय नावे व उपयोग समजावून सांगितले.

दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी

२९ जुलै रोजी सकाळी आयोजित पक्षी निरीक्षण शिबिरात ट्री क्रीपर, इंडियन नटहॅच, ब्ल्यू-फेस्ड मलकोहा, फोर्क-टेल्ड ड्रोंगो कुकू, वृक्ष पाकोळी, ग्रे हेरॉन आणि स्पॉट-बिल्ड डक यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. विशेषतः ट्री क्रीपर हा पक्षी सहभागींसाठी प्रमुख आकर्षण ठरला.

वन्यजीवांची समृद्ध उपस्थिती

भ्रमंतीदरम्यान लंगूर, ससा, रानडुक्कर, चितळ, भेकर, नीलगाय, चौशिंगा यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. तसेच मण्यार, भारतीय अजगर, मांजऱ्या सर्प, विविध कीटक, फुलपाखरे, पतंग आणि ट्री फ्रॉग यांसारख्या जैवविविधतेने राज्यभरातून आलेले व्याघ्रदूत भारावून गेले.

कार्यक्रमासाठी परिश्रम

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सतीश कांबळे, मुकेश सोनार, अजीम काझी, प्रदीप शेळके, रामलाल बोरसे, हेमराज शिंदे, दिनेश सपकाळे, निलेश ढाके, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, मुन्ना शेख, रवी भोई, भरत शिरसाठ, गणेश सपकाळे आणि श्याम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button