Other

जळगाव जिल्हा पोलीस दलाची राज्यस्तरीय TOT प्रशिक्षणात चमक

३ सुवर्ण पदके, २ कांस्य पदकांसह जळगाव पथकाचा उत्कृष्ट कामगिरीचा मान

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय “ट्रेनिंग ऑफ ट्रेनर (TOT)” प्रशिक्षण कार्यक्रमात जळगाव जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-१, पुणे येथे आयोजित या विशेष प्रशिक्षणामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट कामगिरी करत ३ सुवर्ण पदके आणि २ कांस्य पदके पटकावली आहेत.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून राज्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना शस्त्र हाताळणी, आधुनिक प्रशिक्षण पद्धती, सुरक्षाविषयक ज्ञान तसेच दहशतवाद, नक्षलवाद आणि गंभीर गुन्हेगारीविरोधातील कारवाई अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचे मानले जाते.

दि.४ मे ते ९ मे पार पडलेल्या या प्रशिक्षणात जळगाव जिल्हा पोलीस दलातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.

या प्रशिक्षणात राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन विचवे यांनी “शिकवणी” प्रकारात ८३ गुण मिळवत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावले. पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली सय्यद यांनी ७७ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. तसेच पोलीस अंमलदार समीर पठाण यांनी “आंतर वर्ग फायरिंग” प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक, तृतीय क्रमांकासह कांस्य पदक आणि उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सुवर्ण पदक मिळवत विशेष कामगिरी नोंदवली.

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या पथकाने एकूण गुणांच्या आधारे प्रथम क्रमांक मिळवत “सुवर्ण पदक विजेता संघ” हा मान मिळवला. या उल्लेखनीय यशाबद्दल दि.११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक प्रदीप वाघुरकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या पोलीस दलाचा गौरव वाढला असून, भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button