जळगाव जिल्हा हादरला : एका दिवसात दोन खून, किरकोळ वाद, कौटुंबिक संघर्ष ठरला जीवघेणा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात सोमवारी घडलेल्या दोन स्वतंत्र हत्यांच्या घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव शहरात किरकोळ वादातून एका वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, तर पाचोरा येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट खुनात झाले. या दोन्ही घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृतांमध्ये जीवन शालिक पाथकर उर्फ जीवन मिस्तरी (वय ६४) आणि दीपक प्रकाश कानडे (वय ४४, पाचोरा) यांचा समावेश आहे.
शामनगरात वृद्धाची दगडाने ठेचून हत्या
जळगाव शहरातील शामनगर परिसरात रेल्वे पुलाजवळ एका वृद्धाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख जीवन शालिक पाथकर उर्फ जीवन मिस्तरी अशी पटली. ते मूळचे जामनेर तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी होते.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवला. मृताच्या नातेवाईकांनी काही संशयितांची नावे पोलिसांना सांगितल्यानंतर तपासाला वेग आला.
प्राथमिक तपासात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी जीवन मिस्तरी यांच्यावर दगडाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसरा संशयित फरार असल्याचे समजते. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील, जितेंद्र राजपूत, सुधाकर अंबुरे आणि सुशील चौधरी यांच्या पथकाने तातडीने तपास करून संशयिताला ताब्यात घेतले.
पाचोऱ्यात कौटुंबिक वादातून रक्तरंजित शेवट
पाचोरा शहरात कौटुंबिक वादातून एका प्रौढाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. दीपक प्रकाश कानडे यांच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कानडे यांच्या बहिणीचा विवाह आरोपीच्या भावाशी झाला होता. आरोपी संतोष कानडे याचा भाऊ काही वर्षांपूर्वी निधन पावला असून त्यानंतर संतोष आणि त्याची भावजयी यांच्यात मालमत्ता व कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते.
सोमवारी हा वाद थेट पाचोरा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध मारहाणीच्या तक्रारी करण्यात आल्या. दिवसभर तणावाचे वातावरण राहिल्यानंतर रात्री उशिरा हा वाद हिंसक वळणावर गेला.
रात्री सुमारे अकराच्या सुमारास दीपक कानडे हे जामनेर रोड परिसरातून जात असताना संतोष कानडे याने त्यांच्यावर चॉपरने हल्ला केल्याचा आरोप आहे. मानेवर गंभीर वार झाल्याने दीपक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून तपासाला वेग
दोन्ही हत्यांच्या घटनांमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून संबंधित पोलिस ठाण्यांकडून स्वतंत्र तपास सुरू आहे. जळगाव शहरातील प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. तर पाचोरा येथील खूनप्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, किरकोळ वाद आणि कौटुंबिक संघर्षाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने समाजमन हादरले आहे.





