Other

युवारंग युवक महोत्सवात भारतीय संगीत, नाट्य, शास्त्रीय व समुहनृत्यांचा कलाविष्कार सादर

युवारंग युवक महोत्सवात भारतीय संगीत, नाट्य, शास्त्रीय व समुहनृत्यांचा कलाविष्कार सादर

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळ सत्रात विद्यार्थी कलावंतांनी भारतीय संगीत, नाट्य, शास्त्रीय व समुहनृत्यांचा कलाविष्कार सादर केला. यामुळे युवारंगाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संस्कृतीचे रंग भरले गेल्याने प्रेक्षकांमध्येही आनंदोत्सव होता. तसेच बेल्जीयम येथील विद्यार्थ्याने देखील युवारंगात जल्लोष केला.

जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या प्रांगणात ९ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू असलेला युवारंग युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात भारतीय लोक समुहनृत्य ही स्पर्धा झाली या स्पर्धेत केसरीया बालमा आओ पधारो मारे देश, रून झुन बाजे पुखराज, ताहू की गोमेल, घेरू-घेरू, मारा देशारा दिल, सोना आहुती में काय काय, घागर घुमु दे, रामा पावा वाजू दे, आरारारा रंगीलो मारो ढोलना, वेसावसी पारू नेसली गे नेसली, विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोवीला, आईच्या नावाचा गोंधळ मांडीला अशा विविध समुहनृत्याद्वारे राजस्थानी, गुजराथी, कोळी नृत्य, आदिवासी पारंपारिक वेशभुषा परिधान करीत आदिवासी नृत्य, खान्देशी, गोंधळ, दिंडी पारंपारिक वेशभुषा परिधान करून प्रत्येक सहभागी स्पर्धक अतिशय तन्वयतेने आपली कला सादर करताना दिसून येत होता. एकुण २२ महाविद्यालयांच्या संघांनी यात सहभाग घेतला.

रंगमंच क्रमांक २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे भारतीय शास्त्रीय नृत्य ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत कलावंत विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे दर्शन घडवत आपल्या अदाकारीने नृत्य उत्तमोत्तम सादर करण्याचा प्रयत्न केला. भरतनाट्यम, आनंद तांडवम, कथ्थक आदी प्रकार सादर केले. एकुण ८ महाविद्यालयाच्या संघांनी यात सहभाग नोंदविला.

रंगमंच क्रमांक ४ कवी प्रेम धवन या सभागृहात पोस्टर मेकिंग ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी विकसनशील भारत २०३० हा विषय देण्यात आला होता. अतिशय सुरेख रेखाटन स्पर्धकांकडून करण्यात आले. एकुण ५२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

रंगमंच क्रमांक ५ राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृह येथे भारतीय नाट्यसंगीत – एकल या स्पर्धेत गायक विद्यार्थ्यांनी विविध नाट्यगीते सादर केली. या प्रकारात ९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याच रंगमंचावर दुपार सत्रात सुगमसंगीत हा कला प्रकार सादर करण्यात आला. ३७ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविला. अतिशय सुरेख पध्दतीने स्पर्धक सादरीकरण करत होते.

या ‘युवारंग युवक महोत्सव २०२५’ मध्ये शनिवारी एक वेगळीच झलक पाहायला मिळाली. बेल्जियम येथील विद्यार्थी फेलिक्स ग्युबेन यांनी या महोत्सवाला भेट देऊन भारतीय लोककला, संस्कृती आणि खानदेशी परंपरेचा जवळून अनुभव घेतला. फेलिक्स ग्युबेन हे रोटरी युथ एक्सचेंज कार्यक्रमाअंतर्गत भारतात शिक्षणासाठी आलेले असून, त्यांना युवारंग महोत्सवाविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खास जळगावला भेट दिली. दोन दिवस त्यांनी महोत्सवातील सर्व कलाप्रकार रसिकतेने पाहिले. भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय गायन, समूह गान, नाट्यसंगीत, वाद्यसंगीत आणि लोकनृत्य अशा विविध प्रकारच्या सादरीकरणांनी फेलिक्स यांना भारताच्या संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली.

विशेष म्हणजे, आज झालेल्या आदिवासी लोकनृत्याच्या सादरीकरणावेळी फेलिक्स यांनी स्वतः ढोल वाजवत आणि ताल धरत नृत्यकारांसोबत सहभागी होत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी युवरंगाचे कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, अधिसभा सदस्य नेहा जोशी, स्वप्नाली महाजन यांच्यासह विद्यार्थी कलावंत यांनी देखील आदिवासी नृत्य करत आनंद लुटला. भारतीय तरुणांच्या उर्जेने, संस्कृतीप्रेमाने आणि कलाविष्काराने ते पूर्णपणे भारावल्याचे पाहायला मिळाले.

फेलिक्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,

“भारताची कला, संगीत आणि लोकसंस्कृती अतिशय रंगीबेरंगी आणि उत्साही आहे. युवारंग हा महोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे. इथल्या विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि उत्साह पाहून मी प्रभावित झालो.”

 

युवारंग महोत्सवाच्या दरम्यान विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संघांनी भारतीय लोककलांचा संगम सादर करत ‘एकता आणि विविधतेचे’ सुंदर दर्शन घडवले. भारतीय संस्कृतीला परदेशी विद्यार्थ्यांचा असलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद युवारंगच्या यशाला आणखी उजाळा देणारा ठरला आहे.

दरम्यान काल रात्री उशिरा पर्यंत संपन्न झालेल्या एकांकिका स्पर्धेत ९ संघांनी नोंदणी केली होती. आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा परिचय देत विद्यार्थी कलावंतानी मादी, कॅनल, शेवटंच पत्र, धाव-पळ, परवानगी पत्र आणि म्हसनातील सोनं या एकांकिका सादर केल्या. कलावंत विद्यार्थ्यांच्या अभिनयाने व सादरीकरणाने प्रेक्षकांनी उत्कृष्ट दाद दिली.

आज विविध रंगमंचावर युवारंगचे स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष अॅड नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य प्रा. संदिप नेरकर, प्रा. मंदा गावीत, स्वप्नाली काळे, दिपक पाटील, ऋषिकेश चित्तम, नेहा जोशी, प्राचार्य एस.एन.भारंबे, डॉ.प्रिती अग्रवाल, विद्यार्थी विकास संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संजय शेखावत, प्रा. राम भावसार, आदींनी युवारंग युवक महोत्सवाच्या रंगमंचावर भेटी देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

उद्या दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी पारितोषिक वितरण –

या युवक महोत्सवातील गेल्या चार दिवसात झालेल्या विविध कला, सांस्कृतीक स्पर्धेतील विजेत्यांना कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली समारंभात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.संजय सावकारे,वस्त्रोद्योग मंत्र, महाराष्ट्र राज्य, खासदार स्मिता वाघ, सिनेकलावंत केतकी माटेगावकर, आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण रंगमंच क्रमांक १ येथे उद्या सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिसभा सदस्य व विद्या परिषद सदस्य, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल, समन्वयक डॉ. संजय शेखावत उपस्थित राहतील

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button