Social

ZEN Z’ : हरवलेल्या संवादाचा आणि अहंकाराचा आरसा दाखवणारा प्रभावी रंगमंचीय आविष्कार

ZEN Z’ : हरवलेल्या संवादाचा आणि अहंकाराचा आरसा दाखवणारा प्रभावी रंगमंचीय आविष्कार

जळगाव प्रतिनिधी : ​एकच छत, एकच कुटुंब, पण दोन पिढ्यांच्या विचारांमध्ये निर्माण झालेली अदृश्य दरी—हे आजच्या प्रत्येक घरातील वास्तव आहे. एका बाजूला अनुभवाच्या शिदोरीवर आणि काळजीपोटी मुलांचे आयुष्य घडवू पाहणारे पालक, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पंखांनी आभाळ गवसण्याची जिद्द बाळगणारी, स्वातंत्र्याची भाषा बोलणारी नवी पिढी. या दोन टोकांच्या मानसिकतेचा वेध घेत, त्यांच्यातील हरवत चाललेल्या संवादाची जाणीव करून देणारे ‘ZEN Z’ हे नाटक रसिकांना अंतर्मुख करून जाते. खान्देश लोकरंग बहुउद्देशीय संस्था (नगरदेवळा) आणि भाग्यदीप थिएटर निर्मित, तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन, जळगाव यांच्या सहकार्याने रंगमंचावर आलेली ही कलाकृती कय्युम काझी यांच्या लेखणीतून साकारली असून, विनोद बनसोडे यांनी तिचे दिग्दर्शन केले आहे.

​नाटकाचा प्रवास तरुण मुलगा आणि त्याच्या पालकांच्या वैचारिक संघर्षातून सुरू होतो. आवडीचे करिअर आणि पसंतीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार मुलाला हवा आहे, तर वडिलांना आपल्या अनुभवातून त्याच्या आयुष्याची सूत्रे हातात ठेवायची आहेत. या दोघांच्या संघर्षात स्वतःची अपूर्ण स्वप्ने आणि नात्यांची ओढ सांभाळणारी आई मात्र कात्रीत सापडलेली दिसते. कथानकात पुढे मुलगा आणि सिया यांच्या नात्यातून आजच्या तरुणाईचे लग्नसंस्थेविषयीचे प्रखड विचार समोर येतात. प्रेम असूनही लग्नाचे बंधन हवेच का, अपत्यप्राप्ती ही सामाजिक जबाबदारी की वैयक्तिक निवड, आणि संसाराच्या चौकटीत स्वतःचे अस्तित्व टिकून राहते का, असे अस्वस्थ करणारे प्रश्न हे नाटक थेट प्रेक्षकांसमोर उभे करते. सिया आपल्या पालकांसमोर ठामपणे भूमिका मांडते, तेव्हा जुन्या परंपरा आणि नव्या अपेक्षा यांतील संघर्ष अधिकच धारदार होतो. शेवटी हा कौटुंबिक तिढा थेट न्यायालयाच्या पायरीवर पोहोचतो. तिथे रंगणाऱ्या युक्तिवादातून आई-वडिलांचा त्याग आणि तरुणाईचा स्वातंत्र्याचा हट्ट या दोन्ही बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडल्या जातात. कोणत्याही एका पिढीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता, ‘संवाद हाच यावरचा खरा उपाय आहे’, हे सत्य हे नाटक अधोरेखित करते.

​या संपूर्ण नाटकाचा केंद्रबिंदू आणि सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ‘कॉक्रोज’ हे प्रतीकात्मक पात्र. हे पात्र म्हणजे केवळ रंगमंचावर वावरणारे झुरळ नसून, प्रत्येक माणसाच्या मनात दडून बसलेला अहंकार, गैरसमज, हट्टीपणा आणि ‘मीच बरोबर’ या वृत्तीचे जिवंत रूप आहे. दिग्दर्शक विनोद बनसोडे यांनी स्वतः ही भूमिका अत्यंत ताकदीने आणि उपरोधिक शैलीत साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांशी थेट संवाद साधत हे पात्र समाजातील विसंगतीवर नेमके बोट ठेवते. अभिनयाच्या आघाडीवर तरुण पिढीची अस्वस्थता आणि स्पष्टवक्तेपणा प्रांश तायडे (मुलगा) आणि दिक्षा गव्हाणे (सिया) यांनी उत्तमरीत्या पेलला आहे. तर जुन्या पिढीची तळमळ, प्रेम आणि परंपरांचा आग्रह अरुण सानप, डॉ. तेजल चौधरी, निलेश रायपुरकर आणि तेजस्विनी सावळे यांनी अत्यंत संयत आणि प्रभावी अभिनयातून जिवंत केला आहे. न्यायालयातील प्रसंगात न्यायाधीश (दर्शना रायपुरकर), देशपांडे वकील (पंकज बारी) आणि सावंत वकील (प्रकाश राठोड) यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेते. त्याचबरोबर कुणाल सोनार, राज अंभोरे, आशिता भगत, अश्विनी पाटील, रोहित अंभोरे, आर्यन पवार, हर्षा सोनार, गौरव चौधरी, नितीन भालेराव आणि आकाश भावसार यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

​कथानकाला तांत्रिक अंगांचीही तेवढीच भक्कम साथ लाभली. प्रदीप भोई यांची प्रभावी प्रकाशयोजना आणि मोहित पाटील यांचे भावस्पर्शी पार्श्वसंगीत नाटकातील भावनिक चढ-उतार अधिक गडद करतात. वैभव पाटील यांचे नेपथ्य, संगीता नेवे यांची रंगभूषा आणि वर्षा मराठे यांची वेशभूषा प्रत्येक पात्राला अचूक उठाव देते. निर्मिती प्रमुख चिवडामण रामा भोई यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश नन्नवरे, राहुल सोनवणे, ऋषिकेश सोनवणे आणि रवी परदेशी यांनी रंगमंच व्यवस्था अत्यंत चोख सांभाळली.

​थोडक्यात सांगायचे तर, ‘ZEN Z’ हे नाटक केवळ दोन घटकांचे मनोरंजन करत नाही, तर प्रेक्षकांना स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्यास भाग पाडते. ‘पालकांचे प्रेम हे मुलांवर अधिकार गाजवण्यासाठी नसावे आणि मुलांचे स्वातंत्र्य हे जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी नसावे’, हा मोलाचा विचार देणारी ही दर्जेदार कलाकृती सादर केल्याबद्दल खान्देश लोकरंग बहुउद्देशीय संस्था, नगरदेवळाच्या सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांचे मनापासून अभिनंदन!

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button