३.७२ कोटींच्या फसवणूक प्रकरणात अनिल साहित्या याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

३.७२ कोटींच्या फसवणूक प्रकरणात अनिल साहित्या याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
जळगाव, प्रतिनिधी : संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्समधील कार्यालयाच्या व्यवहारात ३ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपातील अनिल प्रेमचंद साहित्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता अधोरेखित केली.
या प्रकरणी सुरेश तलरेजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात विशाल शर्मा आणि खुबचंद साहित्या यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, कार्यालयाच्या व्यवहारासाठी महापालिकेच्या बांधकाम परवानगीसंदर्भातील बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारात ३ कोटी ७२ लाख रुपये देण्यात आल्याचे तसेच कार्यालयाच्या इंटिरिअर आणि फर्निचरसाठी ३५ लाख रुपये खर्च केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‘तारा इस्टेट’ या व्यवसायाशी संबंधित व्यवहारात आवश्यक महापालिका परवानगी नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, १० जून २०२६ रोजी दुसऱ्यांदा नोंदणीकृत विक्री व्यवहार करण्यात आल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
आरोपीच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, प्रकरण केवळ दिवाणी स्वरूपाचे नसून आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांशी संबंधित बाबींचा तपास करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तपासासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. भंगाडिया-झावर यांनी अनिल प्रेमचंद साहित्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तक्रारदाराच्या वतीने अॅड. मुकेश शिंपी यांनी बाजू मांडली.







