
२५ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ७ जानेवारीपासून आयोजन
चार दिवसांत शास्त्रीय गायन, कथक, गझल, ठुमरी, नाट्यसंगीत आणि ‘बॉलीवुड घराना’ची मेजवानी; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार जळगावात
जळगाव, प्रतिनिधी : भारतीय अभिजात संगीताचा खानदेशातील सांस्कृतिक मानदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा रौप्य महोत्सव ७ ते १० जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत रंगणार आहे.
महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहकार्य लाभले असून, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे मुख्य प्रायोजक आहेत. सुहान्स केमिकल्स प्रा. लि. आणि होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांचेही सहकार्य लाभणार आहे. या रौप्य महोत्सवी आयोजनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
७ जानेवारीला सुरुवात
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभानंतर पुण्यात वास्तव्यास असलेल्या पंडिता मंजुषा पाटील कुलकर्णी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना संवादिनीवर लिलाधर चक्रदेव, तर तबल्यावर आशय कुलकर्णी साथ करतील. दुसऱ्या सत्रात जागतिक कीर्तीच्या कथक गुरू पंडिता शमाताई भाटे यांचे शिष्य प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी आणि नयन कोहले ‘त्रिमिती’ हा कथक नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर करतील.
दुसऱ्या दिवशी गझल, ठुमरी आणि कथक
८ जानेवारीच्या पहिल्या सत्रात झी टीव्हीवरील हिंदी ‘सारेगमप’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी असलेले सहेजदीप सिंग गझल व ठुमरी गायन सादर करतील. त्यांना तबल्यावर अमनदीप सिंग, तर दिलरुब्यावर अंशदीप सिंग साथ करतील. दुसऱ्या सत्रात बनारस येथील प्रख्यात कथक नर्तक पं. रुद्र शंकर मिश्रा आपल्या नृत्याविष्कारातून रसिकांना मंत्रमुग्ध करतील. त्यांना पखवाजाची साथ त्यांचे गुरू व पिताश्री पं. माताप्रसाद मिश्रा करतील. उदयशंकर मिश्रा तबला व पढंत, तर ओम सहाई मिश्रा सारंगीची साथ करतील.
कुमार गंधर्व परंपरेतील गायनासह तबला-पखवाज जुगलबंदी
तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयात उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या पंडिता भारती राजपूत यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. पं. कुमार गंधर्व यांच्या परंपरेतील भारती राजपूत कुमारजींच्या अनवट बंदिशी आणि निर्गुणी भजने सादर करतील. त्यांना तबल्यावर निशांत शर्मा, तर संवादिनीवर सुप्रिया मोडक-जोशी साथ करतील. पुढील सत्रात पं. रामदास पळसुले आणि पं. कृष्णा साळुंखे यांची तबला-पखवाज जुगलबंदी रंगणार आहे. पं. अजय जोगळेकर संवादिनीवर साथ करतील.
नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवुड घराना’
१० जानेवारीला पहिल्या सत्रात स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली यांचे नाट्यसंगीत व अभंगवाणीचे सादरीकरण होईल. मकरंद कुंडले ऑर्गनवर, रामकृष्ण करंबेळकर तबल्यावर, तर वरद कवठापूरकर बासरीवर साथ करतील. प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर निरूपण करतील.
नव्या पिढीला अभिजात संगीताची गोडी लागावी, या उद्देशाने प्रतिष्ठान गेल्या २५ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून खास जेन-झी पिढीसाठी अभिजीत पोहनकर आणि सहकारी ‘बॉलीवुड घराना’ हा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाने रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे.
चारही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी मंगला खाडिलकर करणार आहेत. तरुणांसह ज्येष्ठ रसिकांनीही या स्वरोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि महोत्सवाच्या प्रायोजकांनी केले आहे.
प्रवेशिकांसाठी दीपिका चांदोरकर यांच्याशी ९८२३०७७२७७ किंवा २२२७७२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
संपर्क : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, १०१, पार्क रॉयल, १३, वल्लभ नगर, रामानंद चर्चजवळ, जळगाव.







