
जळगावच्या डीपीत १० हजार कोटींचा आरक्षण घोटाळा?; अरविंद देशमुखांचा आरोप
जे. के. पार्कची दुरवस्था, खासगी जागेवर मनोरंजन उद्यानाचे नियोजन; अग्निशमन केंद्र आणि अंबर झरा धरणाच्या आरक्षणावरही सवाल
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) खासगी जमीनमालकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी आरक्षणांमध्ये फेरबदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख यांनी केला. सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेली आरक्षणे वगळून काही खासगी भूखंडांवर नव्याने आरक्षणे टाकण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकाराला १० हजार कोटींचा आरक्षण घोटाळा असे संबोधले. शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत त्यांनी मेहरूणमधील मनोरंजन उद्यान, ई-बस डेपोचा विस्तार, अग्निशमन केंद्र आणि अंबर झरा धरणाच्या पाणीसाठ्यासाठी राखीव क्षेत्रातील बदलांबाबत प्रशासनाला जाब विचारला.
जे. के. पार्कची दुरवस्था, मग खासगी खदानीवर उद्यान कशासाठी?
मेहरूण परिसरात महापालिकेचे सुमारे ११० एकर क्षेत्र असून, त्यातील जे. के. पार्कची अवस्था दयनीय झाली आहे. असे असताना शेजारील खासगी जागेवर नव्याने मनोरंजन उद्यानाचे आरक्षण प्रस्तावित करण्याची गरज काय, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. उद्योजक श्रीराम खटोड यांच्या कुटुंबाशी संबंधित गट क्रमांक ४२४ मधील सुमारे ३.५ एकर जागेवर अम्युझमेंट पार्कचे आरक्षण प्रस्तावित केल्याने संबंधित जमीनमालकाला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला.
या जागेवर सुमारे २६ ते २७ वर्षांपूर्वी खदान होती. आजही काही ठिकाणी ५० फूट खोल खड्डे असल्याचे सांगत, अशा जागेवर उद्यान उभारण्यापूर्वी सुरक्षितता, उपयुक्तता आणि विकासाचा खर्च तपासण्यात आला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच लगतच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, उर्वरित जमिनीचा वापर आणि टी.बी. सॅनिटोरियमच्या जागेबाबतची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली.
पूर्वीच्या जमीन व्यवहारांशी संबंधित प्रकरणांमध्ये खटोड कुटुंबाने महापालिकेकडून कोट्यवधी रुपये वसूल केल्याचा दावाही देशमुख यांनी केला. त्यामुळे नव्या आरक्षणामुळे भविष्यात भूसंपादनाचे दावे उद्भवल्यास महापालिकेवर किती आर्थिक भार पडू शकतो, याचा अभ्यास प्रशासनाने केला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भूसंपादनाच्या गणनेतून आर्थिक भाराचा मुद्दा
महासभेत पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील जागेच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे दाखवल्याचा संदर्भ देत देशमुख यांनी गट क्रमांक ४२४ मधील प्रस्तावित आरक्षणाच्या भूसंपादनाचे गणित मांडले. सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी प्रति चौरस मीटर १ लाख ९५ हजार रुपये दर गृहीत धरल्यास जमिनीचे मूल्य २७३ कोटी रुपये होते. त्यावर २.५ चा गुणक लावल्यास संभाव्य मोबदला ६८२.५० कोटी रुपये होतो.
या रकमेवर वार्षिक ९ टक्के दराने ६१.४२५ कोटी रुपये, तर १५ टक्के दराने १०२.३७५ कोटी रुपये व्याज होऊ शकते, अशी गणना त्यांनी मांडली. भूसंपादनाच्या मोबदल्यास विलंब झाल्यास महापालिकेला मोठा आर्थिक भार सहन करावा लागू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
बुलढाणा अर्बनशी संबंधित जागेच्या व्यवहाराचा संदर्भ देत त्यांनी दुसरे गणितही मांडले. त्यात ४२९.८० कोटी रुपये मूळ मूल्य गृहीत धरून २.५ चा गुणक लावल्यास संभाव्य मोबदला १ हजार ७४.५० कोटी रुपये होतो. या रकमेवर ९ टक्के दराने वार्षिक ९६.७०५ कोटी रुपये, तर १५ टक्के दराने १६१.१७५ कोटी रुपये व्याज होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
दोन्ही गणनांतील संभाव्य मोबदल्यांची बेरीज १ हजार ७५७ कोटी रुपये होत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र, या गणना गृहीत दरांवर आधारित असून, संबंधित भूखंड, लागू दर आणि भूसंपादनाच्या निकषांचा अधिकृत तपशील प्रशासनाने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ई-बस डेपोच्या विस्तारासाठी खासगी जागेचा आग्रह का?
पीएम ई-बस सेवा योजनेतील ५० बसच्या डेपोसाठी मेहरूण येथील टी.बी. सॅनिटोरियम परिसरातील सर्व्हे क्रमांक ४१८ आणि ४१९ मधील जागा निश्चित करण्यात आली आहे. पूरक सुविधांसाठी सर्व्हे क्रमांक ४२१ मधील काही क्षेत्राचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.
परिसरात विद्युत सुविधांची उभारणी झालेली असताना आणि महापालिकेच्या ताब्यातील जागेचा पर्याय उपलब्ध असताना, डेपो व पार्किंगच्या विस्तारासाठी खासगी भूखंडाचा विचार का केला जात आहे, असा सवाल देशमुख यांनी केला. संबंधित जागेचे क्षेत्रफळ, गट क्रमांक आणि संभाव्य भूसंपादन मोबदल्याची माहिती जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.
मेहरूण तलावालगत अग्निशमन केंद्राचे आरक्षण का हटवले?
मेहरूण तलावालगतच्या गट क्रमांक ३८६ मधील जागा पूर्वीच्या विकास आराखड्यात महापालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी राखीव होती. मात्र, नव्या प्रारूप आराखड्यातून हे आरक्षण वगळण्यात आल्याचा आक्षेप देशमुख यांनी घेतला.
तलावालगत वर्षभर पाणी उपलब्ध असताना आणि शेजारी विभागीय क्रीडा संकुल उभारले जात असताना अग्निशमन केंद्रासाठी निश्चित केलेली जागा आरक्षणमुक्त करण्यामागील कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आरक्षण वगळण्याचा प्रस्ताव कोणी मांडला, कोणत्या अहवालाच्या आधारे निर्णय घेण्यात आला आणि पर्यायी जागा निश्चित केली आहे का, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. जुन्या व नव्या आराखड्यांचे नकाशे आणि निर्णयाची संपूर्ण फाईल स्थायी समितीसमोर ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.
मैदाने, उद्यानांच्या आरक्षणांमध्ये फेरबदल?
शहरातील खेळाची मैदाने, उद्याने आणि नागरी सुविधांसाठी राखीव असलेल्या काही जागांवरील आरक्षणे वगळून संबंधित जमीनमालकांना अप्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला. कोणत्या गट क्रमांकांतील आरक्षणे हटवण्यात आली, हे बदल कोणी सुचवले आणि त्यामागील कारणे काय आहेत, याचा गटनिहाय तपशील त्यांनी मागितला.
अंबर झरा धरणाच्या पाणीसाठ्याच्या क्षेत्रावरही आक्षेप
अंबर झरा धरणाच्या पाणीसाठ्यासाठी राखीव असलेल्या गट क्रमांक १७४, १७९ आणि १८० मधील मोठा भाग नव्या प्रारूप आराखड्यातून वगळण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला. प्रत्येक गटातील पूर्वीचे आरक्षित क्षेत्र, नव्या आराखड्यात कायम ठेवलेले क्षेत्र आणि वगळलेले क्षेत्र यांची तुलनात्मक माहिती नकाशांसह सादर करावी, अशी मागणी त्यांनी केली. या फेरबदलाचा धरणाच्या पाणीसाठ्यावर होणारा संभाव्य परिणाम स्पष्ट करणारा तांत्रिक अहवालही सादर करण्याची मागणी त्यांनी केली.
आरक्षणांमधील फेरबदलांमुळे महापालिकेवर पडणाऱ्या संभाव्य आर्थिक भाराची माहिती स्थायी समितीला आधी का देण्यात आली नाही, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. खासगी भूखंडांच्या निवडीचे निकष, आरक्षणांवरील हरकतींचा निपटारा आणि भूसंपादनाच्या संभाव्य खर्चाची माहिती सभागृहासमोर ठेवावी. सार्वजनिक आरक्षणे वगळण्याच्या निर्णयांची चौकशी करून लेखी अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि महापालिकेच्या निधीशी संबंधित निर्णयांचा हिशेब मागत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.







