भुसावळ उपविभागात अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; एक जण अटकेत

भुसावळ उपविभागात अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; एक जण अटकेत
नशिराबादमध्ये कारवाई; ३.९६ लाखांचे साहित्य जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मोठा साठा जप्त केला.
गुरुवारी (७ मार्च २०२५) रात्रगस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून एकूण ३,९६,१५० रुपये किमतीचे गॅस सिलेंडर आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रिक्षाचालक पळाला, एक जण ताब्यात
भुसावळ उपविभागात रात्रगस्ती दरम्यान, नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरताना आढळून आला. पोलिसांना पाहताच रिक्षाचालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
त्याठिकाणी पोलिसांनी आफताब आलम शेख रहीम (वय २८, रा. रहमतपुर, नशिराबाद, ता. जि. जळगाव) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे टाटा Ase कंपनीची मालवाहतूक गाडी, १३ भरलेले गॅस सिलेंडर, ४ रिकामे सिलेंडर, १ अर्धे भरलेले सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ३,९६,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी गु.र.क्र. ३७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७, २८८, २२३ सह अत्यावश्यक सेवा वस्तू अधिनियम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून, त्यात पोलीस हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पोळ यांनी केली.
पुढील तपास नशिराबाद पोलिस ठाणे करीत आहे.