गुटखा आणला, वाद झाला : जळगाव जेलमधील दगडफेक प्रकरणी २३ बंदीवान कैद्यांवर गुन्हा

महा पोलीस न्यूज । दि.३० ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारागृहातील बंदीवान कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. कारागृहातील दगडफेक गुटखा आणल्याच्या संशयावरून झाली असून दोन्ही गटातील तब्बल २३ बंदीवान कैद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैदी जळगाव आणि चाळीसगाव येथील गुन्ह्यातील असल्याचे समजते.
जळगाव जिल्हा कारागृहात गुरुवार दि.२९ रोजी बंदीवान कैदी लोमेश उर्फ निलेश उर्फ निलूआबा युवराज सपकाळे यास भेटण्यासाठी त्याचे नातेवाईक आले होते. त्यांनी कँटीन सामानासोबत विमल गुटखासदृश्य पुड्या दिल्याचा संशय चाळीसगाव येथील कैद्यांना होता. आम्हाला कँटीनच्या वस्तू देत नाही, निलूआबाला कशा देतात यावरून दोन्ही गटात कुरबूर सुरु झाली होती. शुक्रवारी सकाळी तुरूंगाधिकारी राकेश देवरे हे बंदी गणेश दंगल सोनवणे आणि निलेश सपकाळे यांनी वादाची विचारणा करायला गेटजवळ बोलावले.
१ कैदी, २ जेल कर्मचारी जखमी
दोघांना विचारणा सुरु असताना दोन्ही बॅरेकमधील कैदी कर्मचाऱ्यांच्या दिशेने एकमेकांवर धावून गेले. दोन्ही गटातील कैद्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरु करीत हाणामारी सुरु केली. जेल कर्मचारी त्यांना आतमध्ये जाण्यास सांगत होते मात्र त्यांनी सर्कलमध्ये बांधलेल्या भिंतीच्या विटा काढून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. दगडफेकीत सचिन सोमनाथ गायकवाड (वय ३० रा.चाळीसगाव) हा बंदीवान कैदी तसेच सुभेदार सुभाष खरे आणि शिपाई नितीन सपकाळे हे जखमी झाले.
२३ बंदीवान कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पहिल्या गटातील न्यायबंदी गणेश दंगल सोनवणे, विशाल संजय सपकाळे, महेश उर्फ मुकेश राजु सपकाळे, रुपेश संजय सपकाळे, अमोल छगन सोनवणे, लोमेश उर्फ निलेश उर्फ निलु आबा युवराज सपकाळे, हितेश संजय बागुल, रुपेश मनोहर सोनार, प्रशांत उर्फ आकाश युवराज सपकाळे, मयुर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे, प्रशांत सुभाष काकडे, ईश्वर उर्फ दुर्लभ नथ्थू सपकाळे उर्फ कोळी तर दुसऱ्या गटातील न्यायबंदी अमोल छगन गायकवाड, कृष्णा छगन गायकवाड, सचिन सोमनाथ गायकवाड, अनिस उर्फ नव्या शेख शरीफ, सावंत मनसुब वाघरी उर्फ उग्रेजिया, उददेश उर्फ गुडडु, शुभम उर्फ विककी विजय पावले, श्याम उर्फ संम नामदेव चकाण, मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.