
‘नैतिकता उरली असेल तर मंत्री गिरीश महाजन यांनी त्वरित राजीनामा द्यावा’
कुंभमेळा निविदा प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; अशोक लाडवंजारी
जळगाव : कुंभमेळा निविदा प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, तसेच या प्रकरणाची सीबीआयमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांनी केली आहे. या प्रकरणातील संबंधित आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर तपासून संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या निविदा प्रक्रियेबाबत विविध माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध होत आहेत. सफाई, भोजन, वितरण, पाणी वितरण तसेच विविध साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली कथित बनावट निविदा देऊन काही मक्तेदारांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याचा दावा लाडवंजारी यांनी केला. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही या संदर्भात एप्रिल महिन्यात तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करणाऱ्या काही मक्तेदारांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्याचेही लाडवंजारी यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करत संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
कुंभमेळा निविदा प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे नातेवाईक, काही भाजपा कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि दलाल यांचा सहभाग असल्याचा आरोपही लाडवंजारी यांनी केला. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
“कुंभमेळा निविदा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांच्या मोबाईलचा सीडीआर तपासण्यात यावा. या प्रकरणात मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध तपासातून समोर आल्यास त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी. नैतिकता उरली असेल तर त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा; अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी अशोक एस. लाडवंजारी यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गोपाल पाचवणे, गिरीश सांगळे लाडवंजारी, सुहास चौधरी, संजय जाधव, अमोल कोल्हे, राहुल टोके आदी उपस्थित होते.







