अकलूद शिवारात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
तापी नदीकाठच्या दुमजली घरात सुरू होता वेश्याव्यवसाय; संयुक्त पथकाची कारवाई

अकलूद शिवारात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
तापी नदीकाठच्या दुमजली घरात सुरू होता वेश्याव्यवसाय; संयुक्त पथकाची कारवाई
फैजपूर | प्रतिनिधी
फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी एका दुमजली घरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायात अडकलेल्या चार महिलांची सुटका केली. गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलीस कार्यालय फैजपूर, यावल पोलीस ठाणे आणि निंभोरा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने या कारवाईचे नियोजन केले होते. पोलिसांनी आधी पंटर पाठवून खातरजमा केली आणि त्यानंतर संबंधित घरावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्यापैकी तीन महिला मूळच्या कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील असून सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर एक महिला भुसावळ येथील स्थानिक रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
दुमजली घरात अनेक खोल्यांची रचना
पोलिसांच्या कारवाईदरम्यान या दुमजली घरामध्ये आश्चर्यकारकरीत्या अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे आढळून आले. या खोल्यांचा वापर वेश्याव्यवसायासाठी केला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे.या प्रकरणात कुंटणखाना चालविल्याचा आरोप असलेल्या मनीषा प्रकाश झोपे (वय ४५, रा. अकलूद, ता. यावल) हिच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तिच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध कारवाईमुळे अकलूद परिसरात सुरू असलेल्या या कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाला असून, या ठिकाणी आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.






