Other

अमळनेरमध्ये जीवाची बाजी लावत एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुटका

अमळनेरमध्ये जीवाची बाजी लावत एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुटका

पूरग्रस्त गुरुकृपा कॉलनीतील थरार; आरोग्य व अग्निशमन कर्मचाऱ्यांचे धाडसी बचावकार्य

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भालेराव नगरातील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या पुरामुळे एक कुटुंब घरात अडकले होते. अवघ्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबातील सदस्य जीव वाचविण्यासाठी घरातील उंच जागेवर थांबले होते. मात्र आरोग्य व अग्निशमन विभागाच्या धाडसी पथकाने जीवाची पर्वा न करता बचावकार्य राबवत सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

पूराचा प्रवाह इतका वेगवान होता की परिसरात छातीपर्यंत पाणी साचले होते. घरात एक महिन्याचे बाळ, त्याची आई, तीन लहान मुले, तीन महिला आणि इतर कुटुंबीय अडकून पडले होते. घरात पाणी शिरल्याने सर्वांनी पलंग व खाटांवर उभे राहून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने बचाव पथक घटनास्थळी रवाना केले. आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, अग्निशमन कर्मचारी फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंद शिव, पवन बिऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने सुरुवातीला बचावकार्य करणे शक्य होत नव्हते.

त्यानंतर दोर, लाइफ जॅकेट आणि मानवी साखळीच्या साहाय्याने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथक अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचले. सर्वांत आधी एक महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आईसह तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर सदस्यांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले.

या धाडसी आणि वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे एका मोठ्या दुर्घटनेचा धोका टळला. जीवाची बाजी लावून बचावकार्य करणाऱ्या आरोग्य व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button