अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर


अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
जळगाव : वन्यजीव सप्ताहानिमित्त अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिते अंतर्गत ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’ या विषयावर विशेष जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सर्पाविषयी समाजात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, तसेच सर्पाचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव. योगेश गालफाडे यांनी वन्यजीव संरक्षण, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल याबाबत मार्गदर्शन केले. निसर्गातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व असून वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र प्रदीप शेळके, हेमराज सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व तसेच सापांविषयी असलेल्या गैरसमजांबाबत माहिती दिली. साप दिसल्यास घाबरून किंवा त्याला इजा न करता सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून त्यांचे संरक्षण केल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते, हे त्यांनी स्पष्ट केले.
या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना ‘अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक विचार, भीतीपेक्षा योग्य माहिती आणि नाशाऐवजी संवर्धन’ हा संदेश मिळाला. सर्पाविषयीची भीती आणि गैरसमज दूर करून त्यांच्याप्रती संवेदनशीलता निर्माण करण्याबरोबरच पर्यावरणातील जैवविविधतेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली, गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे समन्वयक राजेंद्र बावस्कर यांच्या नियोजनातून करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती शिक्षिका पूजा पाटील यांची होती. भावना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.







