गोंडगाव अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार अपयशी
भाजप नेते अनिल वाघ यांचा पत्रकार परिषदेत आरोप

गोंडगाव अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार अपयशी
भाजप नेते अनिल वाघ यांचा पत्रकार परिषदेत आरोप
भडगाव | प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करत भाजप नेते अनिल वाघ यांनी स्थानिक आमदारांवर टीका केली. नसरापूर प्रकरणात अवघ्या ६० दिवसांत न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल त्यांनी न्यायालय तसेच महायुती सरकारचे अभिनंदन केले.
पत्रकार परिषदेत बोलताना वाघ म्हणाले की, गोंडगाव प्रकरणाचा प्रभावी पाठपुरावा विधानसभेत करण्यात आला नाही. जलदगती न्यायालय, विशेष सरकारी वकील आणि न्यायप्रक्रियेबाबत जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
गोंडगाव प्रकरणात तातडीने न्याय मिळावा, विशेष सरकारी वकील नियुक्त करावा आणि जलदगतीने खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा भाजपच्या वतीने भडगाव तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वाघ यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद नेरकर, सोमनाथ पाटील, हर्षल पाटील, निलेश पाटील, किरण शिंपी, योजना पाटील, योगिता पाटील, सचिन चोरडिया, मुरली भिल्ल, चेतन पाटील, आबा महाजन, विशाल चौधरी, कुणाल पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





