शिवसेना-युवासेना व स्व. बापुजी युवा फाऊंडेशन वतीने गुणगौरव सोहळा मार्गदर्शन शिबीर संपन्न

शिवसेना-युवासेना व स्व. बापुजी युवा फाऊंडेशन वतीने गुणगौरव सोहळा मार्गदर्शन शिबीर संपन्न
भडगाव ( प्रतिनिधी) 28जून 2026रोजी भडगाव येथे शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षांमधील यश आणि सार्वजनिक जीवनातील प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याची अनोखी परंपरा जपणाऱ्या स्व. बापूजी युवा फाउंडेशन, भडगाव यांच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळा हजारो युवक-युवतींच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांसह कै. शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिका नगरपरिषद व सारथी अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींचा विशेष सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून सरकारी सेवेत प्रवेश करणाऱ्या तरुणांचा गौरव केल्याने हा कार्यक्रम केवळ सत्कार सोहळा न राहता नव्या पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केंद्र ठरला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रे देऊन त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेले प्रा. विनोद बाबर सर यांचे “युवा पिढी आणि बदलत्या काळातील आव्हाने” या विषयावरील विशेष व्याख्यान उपस्थितांना विचार करायला भाग पाडणारे ठरले. युवकांनी शिक्षण, कौशल्य विकास, संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि स्पर्धात्मक युगातील संधी यांचा योग्य मेळ साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्षा रेखा मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, गटनेते लखीचंद पाटील नगरसेविका सौ समिक्षा पाटील,युवराज पाटील,विजय भोसले,अलिम शाह ,रावसाहेब पाटील,जितेंद्र आचारी,अतुल परदेशी,न.प सर्व नगरसेवक,शिवसेना सर्व पदाधिकारी पत्रकार ,गुणवंत विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.






