Special

एकच नावाचा दोन जिल्ह्यात थरकाप : एम.राजकुमार यांचे ‘मिशन अबतक ५६’ फत्ते, गुन्हेगारी संपवणारे ‘किंग’

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची हमी देत, सराईत गुन्हेगार, वाळू तस्कर, ड्रग्ज माफिया आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या टोळ्यांवर कायद्याचा कठोर वरवंटा फिरवणारे ‘धडक’ अधिकारी म्हणून पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असताना निर्माण केलेले ‘अब तक ५६’ चे रेकॉर्ड त्यांनी आता सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून काम करताना अवघ्या सव्वा दोन वर्षांत पुन्हा एकदा करून दाखवले आहे. त्यांच्या या आक्रमक आणि ‘झिरो टॉलरन्स’ कार्यशैलीमुळे दोन्ही जिल्ह्यातील कुख्यात गुंडांचे धाबे दणाणले आहेत.

जळगावात निर्माण केला होता थरकाप!
एम. राजकुमार यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक पद सांभाळत असताना जिल्ह्यात गंभीर गुन्हे, वाळू तस्करी आणि अवैध धंद्यांमुळे निर्माण झालेली दहशत मोडून काढण्यासाठी ‘मिशन ५६’ हाती घेतले होते. अवघ्या वर्षभरात ५० हून अधिक आणि एकूण ५६ सराईत गुन्हेगारांवर त्यांनी ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत थेट स्थानबद्धतेची कारवाई केली होती. या मोहिमेत रामानंद नगर सारख्या स्थानिक पोलीस ठाण्यांच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अवघ्या ६ महिन्यांत अनेक प्रस्ताव तयार करून या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली होती. जळगावातील या कुख्यात गुन्हेगारांना नाशिक, नागपूर अशा मध्यवर्ती कारागृहाची हवा खावी लागली होती.

सोलापूर शहरातही इतिहासची पुनरावृत्ती; ५६ गुन्हेगार थेट येरवड्यात
जळगावचा हाच ‘सक्सेस पॅटर्न’ एम. राजकुमार यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राबवला. २० फेब्रुवारी २०२४ ते २० मे २०२६ या अवघ्या सव्वा दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी सोलापूर शहरातील तब्बल ५६ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करून त्यांना थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात डांबले आहे. १९९२ मध्ये सोलापूर पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासूनच्या इतिहासात सव्वा दोन वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच ऐतिहासिक आणि रेकॉर्डब्रेक कारवाई ठरली आहे. सोलापुरात सरासरी दर पाच दिवसांत एका गुन्हेगाराला तडीपार किंवा स्थानबद्ध करण्यात आले आहे.

कारवाई सुरूच राहणार : एम.राजकुमार
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मकोका, तडीपारी आणि ‘एमपीडीए’ यासह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येतात. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया आवश्यक असतात. भविष्यात यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे. असे एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी सांगितले आहे.

काय आहे ‘एमपीडीए’ कारवाईचा धाक?
महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज (MPDA) हा कायदा सामाजिक शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध वापरला जातो. या कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या गुन्हेगाराला थेट एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले जाते आणि त्यांना सहजासहजी जामीन मिळत नाही. एम. राजकुमार यांनी या कायद्याचा अचूक आणि आक्रमक वापर करत दोन्ही जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे पार मोडून काढले आहे.

सलग दोन जिल्ह्यात रेकॉर्ड
एका जिल्ह्यात नव्हे, तर सलग दोन जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात आपल्या धडाकेबाज कामगिरीने ‘अब तक ५६’ चा आकडा पार करणारे एम.राजकुमार हे सध्या महाराष्ट्र पोलीस दलात कौतुकाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठांनी देखील त्यांचे कौतुक केले असून, सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोलापूर शहरात डीजे बंदीच्या निर्यायातील त्यांच्या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button