Other

अतिदुर्गम टिटवापाणी परिसरात गांजाची शेती उद्ध्वस्त

अतिदुर्गम टिटवापाणी परिसरात गांजाची शेती उद्ध्वस्त

२४ लाखांचा ४८० किलो कॅनाबीस गांजा जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई

शिरपूर : तालुक्यातील अतिदुर्गम टिटवापाणी परिसरात वनविभागाच्या जमिनीवर कपाशीच्या पिकामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असलेल्या कॅनाबीस वनस्पतीची लागवड केल्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून तब्बल ४८० किलो कॅनाबीस अंमली पदार्थ, अंदाजे २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांची चाहूल लागताच लागवड करणारे दोन्ही संशयित शेतातून पसार झाले.

गोपनीय माहितीवरून कारवाई

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १३ ऑगस्ट रोजी टिटवापाणी परिसरात कारवाई करण्यात आली. दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित वनजमिनीवर छापा टाकण्यात आला.

दोन ठिकाणांहून ४८० किलो कॅनाबीस जप्त

मदन भरतसिंग पावरा याच्या ताब्यातील वनजमिनीवरून ३०० किलो कॅनाबीस, अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे, तर अमित चावऱ्या पावरा याच्या ताब्यातील वनजमिनीवरून १८० किलो कॅनाबीस, अंदाजे ९ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. दोन्ही ठिकाणांहून एकूण ४८० किलो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच मदन भरतसिंग पावरा (रा. टिटवापाणी, पो. चिलारे, ता. शिरपूर) आणि अमित चावऱ्या पावरा (रा. चितोर, ता. शिरपूर) हे दोघेही शेतातून पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३३/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २०(अ)(i) आणि २८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि. मनोज कचरे, पोउनि. मिलिंद पवार तसेच पोलीस अंमलदार संजय चव्हाण, सागर ठाकूर, संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास कोळी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय ढिबरे, सुनील पवार, वाला पुरोहित, धनराज गोपाळ, अल्ताफ मिर्झा व इसरार फारुकी यांच्या पथकाने ही कारवाई केली

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button