मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; नागेश्वर कॉलनीतील हृदयद्रावक घटना

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; नागेश्वर कॉलनीतील हृदयद्रावक घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरात शनिवारी (१ जून) सायंकाळी सुमारे ६ वाजता मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संतप्त नातेवाइकांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सदर घटनेत अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड (वय ४) हा आपल्या घरासमोरील अंगणात खेळत असताना एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या मानेवर जोरदार चावा घेतल्याने बॉबी गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या बालकाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही दुर्दैवी बातमी कळताच गायकवाड कुटुंबीय, नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्णालय परिसरात शोककळा पसरली. कुटुंबीयांनी हृदयद्रावक आक्रोश करत महापालिकेच्या दुर्लक्षावर तीव्र रोष व्यक्त केला.
या घटनेनंतर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त करत, शहरातील मोकाट कुत्र्यांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्याची आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.