भक्तिमय वातावरणात श्री गुरु पौर्णिमा उत्सवाची मंगलमय सांगता

भक्तिमय वातावरणात श्री गुरु पौर्णिमा उत्सवाची मंगलमय सांगता
महाअभिषेक, चरित्र वाचन, प्रवचन, गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठांचा सत्कार; महाप्रसादाने उत्सवाची सांगता
जळगाव | प्रतिनिधी
श्री गुरु पौर्णिमा उत्सवाचा तिसरा व अंतिम दिवस अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध धार्मिक विधी, प्रवचन, सत्कार समारंभ आणि महाप्रसाद यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सकाळी श्रींचा महाअभिषेक श्री. अजय विजय चौधरी आणि श्रीरंग पुरणकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सचिन कुलकर्णी गुरुजी आणि श्री. रामनाथ बुवा अय्यर यांनी वेदोक्त मंत्रोच्चारात अभिषेक विधी मंगलमय वातावरणात पार पाडला.
सकाळी ११ वाजता परमपूज्य डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या प्रासादिक ओळीबद्ध चरित्राचे वाचन श्री. जानकीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आरती होऊन सकाळच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली.
सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत श्री. रामनाथ बुवा अय्यर यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी विवेचन झाले. त्यानंतर समाजातील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शालिनी बढे यांनी केले. कार्यक्रमाचा परिचय सौ. शिप्रा देऊळगावकर यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन सौ. आरती इंगळे यांनी केले.
आरती आणि महाप्रसादाने तीन दिवसीय श्री गुरु पौर्णिमा उत्सवाची भक्तिभावपूर्ण वातावरणात मंगलमय सांगता झाली.







