वाघाच्या हद्दीत शिकारीचा कट उधळला, दोघे ‘बंदूकधारी’ जाळ्यात!

महा पोलीस न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील प्रस्तावित ‘मुक्ताई-भवानी अभयारण्य’ अंतर्गत येणाऱ्या वडोदा वनक्षेत्रातील व्याघ्र अधिवास क्षेत्रातून (सुकळी नियत क्षेत्र) शिकार करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या दोन आरोपींना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बंदुक जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि डोलारखेडा वनविभागाचे कर्मचारी रात्री १२.२० च्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी सुकळी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ५४२ मध्ये दोन इसम गावठी बंदुकीसह ‘चितळा’च्या शिकारीच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.
दोघांना पथकाने पकडले
वनविभागाचे कर्मचारी मागोवा घेत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी तातडीने पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश मिळवले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे एक गावठी बंदुक आढळून आल्या. वनविभागाने अजीज अन्सारी (वय २९) आणि जलील अहमद (वय ५०) दोघे रा.बर्हाणपूर या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वनविभागाकडून सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून, सर्व दृष्टिकोनातून तपास केला जात असल्याची माहिती वनसूत्रांनी दिली आहे.
यशस्वी कारवाई
जळगाव उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे, डोलारखेडा वनपाल गणेश गवळी, वनरक्षक गोकुळ गोसावी, नवल जाधव, नितीन खंडारे, रजनीकांत चव्हाण, अक्षय मोरे आणि सुधाकर कोळी यांनी ही कौतुकास्पद कारवाई पूर्ण केली. वनविभागाच्या या तत्पर कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.






