
१५ हजारांची लाच भोवली, महावितरणचे तिघे जाळ्यात
वीजचोरीची कारवाई टाळण्यासाठी ४० हजारांची मागणी, जळगाव एसीबीची कारवाई
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । वीजचोरीची कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करून अटक केली आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात ही सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच मागणीचे प्रकरण
या प्रकरणातील तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून त्यांचे वय ४० वर्षे आहे. तक्रारदार यांच्या घरी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी वीजमीटरची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी घरातील नवीन वीजमीटरची तपासणी करून मीटरचे तसेच घरातील विद्युत उपकरणांचे फोटो काढण्यात आले. तपासणीदरम्यान घरातील विद्युतभार (लोड) जास्त असल्याचे तसेच सर्व्हिस वायरला बायपास करून वीजचोरी होत असल्याचे तक्रारदाराला सांगितले.
पांडे चौकात बोलवून मागणी
काही वेळानंतर संशयितांनी तक्रारदाराला फोन करून पांडे चौक येथे बोलावले. वीजचोरीची कारवाई टाळायची असेल तर ४० हजार रुपये द्यावे लागतील आणि पैसे न दिल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी मागणी आरोपींनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
४० हजारांवरून १५ हजारांत तडजोड
संबंधित कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. १४ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या घरी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान संशयित आरोपी यांनी तक्रारदाराकडे वीजचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली.
१५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
लाच मागणीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. शनिवार, दि.१४ रोजी पांडे चौक, जळगाव येथे एकाने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणात लाचेची मागणी आणि स्वीकारण्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अन्य दोन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तिघे संशयीत अटकेत
या प्रकरणात विशाल वसंत नेमाडे (वय ३७) – सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जळगाव शहर, महसूल व देयक उपविभाग, भरत कडू तायडे (वय ४५) – वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जळगाव शहर, महसूल व देयक उपविभाग, रवींद्र छन्नू पाटील (वय ४१) – वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जळगाव शहर, महसूल व देयक उपविभाग यांना अटक करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
एसीबीच्या पथकाची कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी काम पाहिले.
या कारवाईत पोलीस हवालदार/पोलीस कर्मचारी पोहवा/बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.







