नारळी नदीच्या पुराचा खेडगावला मोठा फटका; १०० ते १२० घरांमध्ये पाणी

नारळी नदीच्या पुराचा खेडगावला मोठा फटका; १०० ते १२० घरांमध्ये पाणी
चाळीसगाव तालुक्यातील खेडगावमध्ये पूरस्थिती; शेळ्या वाहून गेल्या, दुकाने व घरांचे मोठे नुकसान
चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील मौजे खेडगाव येथे मुसळधार पावसामुळे नारळी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने नदीकाठावरील तसेच गावातील सुमारे १०० ते १२० झोपड्या व पक्क्या घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पूराच्या पाण्यामुळे अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले. तसेच अंदाजे १५ ते २० शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय काही गाळे आणि व्यावसायिक दुकानांचेही नुकसान झाले असून नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
प्रशासनाकडून तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने पूरग्रस्त भागाची पाहणी करून बाधित कुटुंबीयांची भेट घेतली. प्रभावित नागरिकांसाठी तातडीने अन्नाची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक मदत पुरविण्याचे काम सुरू आहे.
पंचनामे युद्धपातळीवर
नुकसानग्रस्त घरे, दुकाने, जनावरे व इतर मालमत्तेचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल तयार झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत व इतर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.







