लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; अनधिकृत लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; अनधिकृत लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांपासून लाभार्थी महिलांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे संदेश तसेच त्यासंदर्भातील विविध लिंक प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, सद्यस्थितीत शासन स्तरावरून ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतेही नवीन निर्देश प्राप्त झालेले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनधिकृत लिंकवर विश्वास ठेवू नये. अशा लिंकवर क्लिक करून आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा अन्य वैयक्तिक माहिती भरू नये. या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ई-केवायसी प्रक्रियेबाबत शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत अधिकृत सोशल मीडिया माध्यमे तसेच वृत्तपत्रांद्वारे लाभार्थ्यांना माहिती देण्यात येईल.
त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता केवळ शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







