ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन
नागपूर। प्रतिनिधी
येथील पत्रकारितेतील ज्येष्ठ, अभ्यासू व निस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी (वय 90) यांचे मंगळवारी (दि. 28) दुपारी 2 वाजता देवनगर येथील सत्यम हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,जावाई,नातवंडे असा परिवार आहे. यांची अन्त्य यात्रा उद्या बुधवार, दि. 29 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता, सहकार नगर, कुकुराज अपार्टमेंट नागपूर येथील निवासस्थानावरून निघणार असून सहकार नगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी नागपूर तरुण भारत या दैनिकात मुख्यसंपादक म्हणून कार्य केले. त्यानंतर काही काळ गोव्यात गोवादूतचे संपादक म्हणून काम केल्यानंतर जळगाव येथे तरुणभारते संपादक असताना जळगाव जिल्ह्यातील गावागावात संपर्क साधत आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर पुन्हा नागपूरला परतले पुढे त्यांनी लोकशाही वार्ता या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली.लोकशाही वार्ता मधून निवृत्त झाल्यानंतर लक्ष्मणराव जोशी यांनी नागपूर येथूनच दै.देशदूतसाठी 2017 पासून जानेवारी 2026 पर्यंत शब्दगंध पुरवणीसाठी सारांशचे लिखाण करीत खान्देशशी आपली नाळ कायम ठेवली.फेब्रुवारी 2026 ला आता लिखाण करणे शक्य नाही असे कळवत त्यांनी सारांश थांबवला.तेव्हापासूनच त्यांची प्रकृती खालवली होती, पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, निर्भीड लेखन आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा त्यांनी जपली. त्यांच्या लेखणीने अनेक सामाजिक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडली तसेच नवोदित पत्रकारांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.







