नंदुरबार जिल्ह्यातील तीन घरफोड्यांचा पर्दाफाश; दोन आरोपींसह दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

नंदुरबार जिल्ह्यातील तीन घरफोड्यांचा पर्दाफाश; दोन आरोपींसह दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १ लाख ६२ हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत, सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून चोरट्यांचा माग
नंदुरबार : बंद घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीच्या कारवायांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने चाप लावला आहे. जिल्ह्यातील नंदुरबार शहर, अक्कलकुवा आणि नवापूर येथील तीन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपी आणि दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.
काका-पुतण्याने फोडले घर; अल्पवयीन बालकाकडून ६० हजार हस्तगत
नंदुरबार शहरातील स्वामी समर्थ नगर, कोरीट नाका रोडवरील घर क्रमांक ७५ येथे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० या कालावधीत घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ६२ हजार ५०० रुपये रोख, चांदीचे दागिने आणि साड्या असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०८ वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर आणि त्याचा पुतण्या राजसिंग लखनसिंग शिकलीकर (दोघेही रा. म्हाडा कॉलनी, एकता नगर, नंदुरबार) यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, हे संशयित उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजकुपा चौकातून नंदुरबार शहरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा रचला. यावेळी एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने काका परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर याच्यासोबत कोरीट नाका परिसरातील घरफोडीत सहभागी असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ६० हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले. चोरी केलेले चांदीचे दागिने आणि साड्या काका परबतसिंग याच्याकडे असल्याचेही त्याने सांगितले. अल्पवयीन बालक आणि हस्तगत मुद्देमाल पुढील तपासासाठी नंदुरबार शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
शीतपेय गोडाऊनमधील ७५ हजारांचे साहित्य हस्तगत
अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतपेय निर्मितीच्या गोडाऊनमधून १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ या कालावधीत विविध यंत्रसामग्री चोरीला गेली होती. यामध्ये १८ हजार रुपये किमतीची फिलिंग मशीन मोटार, १८ हजारांचा फिलिंग मशीन प्रेशर पंप, १५ हजारांचा फिलिंग मशीन कार्बनेटर टँक, ८ हजारांचा होमोनायझर प्रेशर वॉल, ३० हजारांचे ऑक्सीनेटर मशीन, ४ हजारांची ब्रिफेज वायर आणि ३० हजार रुपये किमतीचे स्टील पाइप यांचा समावेश होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रवी अनिल पाडवी (वय २७) आणि मंगलसिंग दशरथ पाडवी (वय २५), दोघेही रा. सोरापाडा (डाबरा), ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा कार्बनेटर टँक, ३० हजारांचे ऑक्सीनेटर मशीन आणि ३० हजार रुपये किमतीचे स्टील पाइप असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी अक्कलकुवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मिस्त्री कामगाराच्या घरातून पैसे व मोबाईल चोरी; २७ हजारांचा मुद्देमाल मिळवला
नवापूर येथील करंजी ओवारा, नयाहोंडा येथे राहणारे दिनेश बापड्या मावची (वय ३९, व्यवसाय मिस्त्री काम) यांनी कष्टाच्या कमाईतून घरात पैसे साठवून ठेवले होते. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची दोरी कापून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील पैशांचा पत्राटी डबा, त्यातील २५ हजार रुपये रोख आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नवापूर बसस्थानक परिसरातून एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ हजार रुपये रोख आणि १५ हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा मोबाईल असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संबंधित बालक आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी प्रेसनोटनुसार अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश निकम, पोलीस उपनिरीक्षक श्री. विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, जितेंद्र तांबोळी, मुकेश तावडे, योगेंद्र सोनार, दादाभाई मासुळ, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक चेतन साळवे, राहुल बोराळे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, मनोज महाजन, राहुल पांढारकर, भरत उगले, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी आणि महिला पोलीस अंमलदार रोहिणी धनगर यांचा समावेश होता.







