Crime

घराच्या जिन्याखाली गांजाचा साठा; रावेर पोलिसांचा छापा, ३.२५० किलो गांजा जप्त, एकाला अटक

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ऑपरेशन ऑल आउटमध्ये पोलिसांची धडक कारवाई

घराच्या जिन्याखाली गांजाचा साठा; रावेर पोलिसांचा छापा, ३.२५० किलो गांजा जप्त, एकाला अटक

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ऑपरेशन ऑल आउटमध्ये पोलिसांची धडक कारवाई

रावेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या विक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, रावेर तालुक्यातील पाल येथे घरातच गांजाचा साठा करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका ३६ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मेहरबान जहाँगीर तडवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या राहत्या दुमजली घरावर छापा टाकला असता प्रवेशद्वारासमोरील जिन्याखाली लपवून ठेवलेला ३ किलो २५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, त्याची किंमत १ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. तसेच १६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, अवैध धंद्यांना आळा घालणे आणि गुन्हेगारांविरोधात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या पथकाला अंमली पदार्थांच्या अवैध साठवणुकीची माहिती संकलित करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी त्यांना गोपनीय बातमीदाराकडून पाल येथील मेहरबान जहाँगीर तडवी याने स्वतःच्या मालकीच्या दुमजली घरात गांजा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर दुपारी २ वाजून २० मिनिटांनी छापा टाकला. यावेळी घराच्या प्रवेशद्वारासमोरील जिन्याखाली विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला ३ किलो २५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०२/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ च्या कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक तथा चाळीसगाव परिमंडळाचे अधिकारी आणि जळगाव परिमंडळाचा अतिरिक्त कार्यभार असलेले अशोक नखाते, तसेच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने कामगिरी केली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, इस्माईल तडवी, विकार शेख आणि श्रीकांत चव्हाण यांचा समावेश होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button