अडावद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

अडावद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई
सलग दोन दिवसांत दोन ट्रॅक्टरसह ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन गुन्हे दाखल
अडावद | प्रतिनिधी
अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक व चोरीविरोधात अडावद पोलिसांनी धडक कारवाई करत सलग दोन दिवसांत दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका आरोपीला नामनिर्देशित करण्यात आले आहे, तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपी फरार आहे.
वडगाव येथे पहिली कारवाई
पहिली कारवाई वडगाव गावदरवाजाजवळ करण्यात आली. यावेळी छोटू बाबुराव पाटील (वय ५१, रा. वडगाव) हा स्वराज ट्रॅक्टर (एमएच १९ सीयू ५५४०) व ट्रॉली (एमएच १९ एएन ६१०३) मधून सुमारे दीड ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गु.र.नं. १५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करून ४,०७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
धानोरा-पारगाव फाट्याजवळ दुसरी कारवाई
दुसरी कारवाई धानोरा ते पारगाव फाट्याजवळ करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच विना नंबरच्या जॉन डीअर ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वाळूची चोरी करून वाहतूक करणारा अज्ञात चालक ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पसार झाला. या प्रकरणी गु.र.नं. १५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३,०७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू
दोन्ही कारवाया अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. पहिल्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अन्वर तडवी, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे करीत आहेत.







