सातपुड्याचा वाघ वाचवा’ जनजागृती दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातपुड्याचा वाघ वाचवा’ जनजागृती दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त १६ वी राज्यस्तरीय व्याघ्र संवर्धन मोटारसायकल रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
जळगाव | प्रतिनिधी
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था, जळगाव (VJSS), वनविभाग जळगाव, वनविभाग यावल आणि टायगर कन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सातपुड्याचा वाघ वाचवा’ १६ वी राज्यस्तरीय व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता जळगावातील काव्यरत्नावली चौक येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक राम धोत्रे, उपवनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) महेश झांजुर्णे, उपवनसंरक्षक (यावल) संजय सहाय, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, टायगर कन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे प्रसाद हिरे, सुप्रीम इंडस्ट्रिजचे व्यवस्थापक सुरेश मंत्री, जनरल मॅनेजर ज्ञानदेव महाडिक, रवीकिरण कोंबडे, मुकेश सोनवणे, संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, संस्थापक बाळकृष्ण देवरे आणि सचिव योगेश गालफाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पथनाट्य व वाघाच्या वेशभूषेने वेधले लक्ष
विनोद ढगे यांच्या दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी व्याघ्र संवर्धनावर प्रभावी पथनाट्य सादर केले. तसेच हेमराज सपकाळे आणि दीपक महाजन यांनी साकारलेल्या वाघाच्या आकर्षक वेशभूषेने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
शहरातून गावाकडे जनजागृतीचा संदेश
काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेडियम कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुली, नशिराबाद, भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर, डोलारखेडा ते चारठाणा असा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला असल्याची माहिती अजीम काझी यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश गालफाडे यांनी केले, तर आभार बाळकृष्ण देवरे यांनी मानले.
व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृतीवर भर
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सातपुडा परिसरातील वाघांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत वन्यजीव संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. उपवनसंरक्षक राम धोत्रे यांनी वनविभागाच्या विविध संवर्धन योजनांची माहिती देत अशा जनजागृती अभियानांची गरज स्पष्ट केली.
दुसऱ्या दिवशी पक्षीनिरीक्षण व गावागावांत जनसंवाद
दि. २९ जुलै रोजी सकाळी पक्षीनिरीक्षण कार्यक्रमानंतर चारठाणा येथून जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला. वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे अध्यक्षस्थानी होते. प्रसाद हिरे, विनोद सोनवणे, संजय खैरनार आणि मानद वन्यजीव रक्षक आकाश आहाले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मुक्ताई-भवानी प्रस्तावित व्याघ्र संवर्धन राखीव वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये जनजागृती रॅली, पथनाट्य, जनसंवाद आणि माहितीपत्रकांचे वितरण करून व्याघ्र संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
विविध संस्थांचे सहकार्य
या दोन दिवसीय अभियानासाठी योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे, बजाज ऑटोचे संचालक संजय खैरनार, सुप्रीम इंडस्ट्रिज आणि जळगाव जनता बँक यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे निमंत्रक सहाय्यक उपवनसंरक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक समाधान पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, तसेच VJSS चे पदाधिकारी, वन्यजीव अभ्यासक राहुल सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले
“वाघाचे संरक्षण म्हणजे संपूर्ण जंगल परिसंस्थेचे संरक्षण होय. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सातत्यपूर्ण जनजागृती हीच व्याघ्र संवर्धनाची खरी ताकद आहे.” — रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव







