शिवकॉलनी चौकात पुन्हा अपघात; तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा चेंदामेंदा

महा पोलीस न्यूज । दि.१ जून २०२५ । जळगाव शहरातील शिवकॉलनी चौकात रविवारी १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात धरणगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले श्री. सोनार (पूर्ण नाव अद्याप समजलेले नाही) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनुसार, मयत विशाल रमेश सोनार वय-४४ हे रविवारी दुपारी शिवकॉलनी चौकात रस्ता ओलांडत असताना खोटेनगरकडून येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात त्यांच्या चेंदामेंदा झाला. घटनास्थळी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पथक दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, वाहन चालकाने घटनास्थळाहून पळ काढला आहे.
शिवकॉलनी चौक हा अपघातांचा ‘हॉटस्पॉट’
शिवकॉलनी चौक हा अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून कुप्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या एका गंभीर अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने चौकात गतिरोधक (स्पीड ब्रेकर) आणि सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, गतिरोधक आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वितही झाली होती. मात्र, उन्हाळ्यात गतिरोधकांचे डांबर वितळल्याने ते प्रभावहीन झाले, तर रविवार असल्याने सिग्नल यंत्रणा बंद होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.