PoliticsSocial

जळगाव मनपाचा भोंगळ कारभार : २४ तास पथदिवे सुरू, विजेचा अपव्यय

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील शनिपेठ आणि बळीराम पेठ परिसरात गेल्या तब्बल १५ दिवसांपासून पथदिवे दिवसरात्र सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली असून अनेक ठिकाणी भारनियमनाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, तर दुसरीकडे शहरातच अशा प्रकारे विजेचा अपव्यय होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित परिसरातील अनेक पथदिवे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरूच राहत आहेत. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांनी याबाबत स्थानिक नगरसेवकांना अनेकदा माहिती दिल्याचे सांगितले आहे. तसेच दि. १८ रोजी नगरसेवक विष्णू भंगाळे हे प्रभागात आले असता नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष दिवसा सुरू असलेले पथदिवे दाखवले होते. मात्र, त्यानंतर तब्बल आठ दिवस उलटूनही अद्याप परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसून पथदिवे सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या घरगुती तसेच औद्योगिक वीज वापरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे काही भागात विजेचा तुटवडा निर्माण होत असून भारनियमनाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक पथदिवे दिवसा सुरू ठेवणे म्हणजे थेट विजेचा अपव्यय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

याशिवाय, पथदिवे सतत सुरू राहिल्याने जळगाव महानगरपालिकेच्या वीज बिलावरही अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची चर्चा आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या मनपेला अशा निष्काळजीपणामुळे लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने दखल घेत पथदिव्यांची तपासणी करून दोष दूर करावेत, तसेच भविष्यात अशा प्रकारचा विजेचा अपव्यय होणार नाही यासाठी योग्य यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button