पारोळ्यातील राम मंदिर परिसरात सापडली पुरातन तांब्याची व चांदीची नाणी
पाया खोदकामादरम्यान सापडले ऐतिहासिक नाण्यांचे भटुर; प्रशासनाने ताब्यात घेतली नाणी

पारोळ्यातील राम मंदिर परिसरात सापडली पुरातन तांब्याची व चांदीची नाणी
पाया खोदकामादरम्यान सापडले ऐतिहासिक नाण्यांचे भटुर; प्रशासनाने ताब्यात घेतली नाणी
पारोळा (प्रतिनिधी) – शहरातील ऐतिहासिक मोठ्या राम मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामावेळी पुरातन काळातील तांब्याची व चांदीची नाणी सापडल्याची महत्त्वपूर्ण घटना गुरुवारी (१२ जून) उघडकीस आली. मंदिराच्या चारही बाजूंना सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सुरू असताना, पाया खणताना एका भटुरच्या तांब्यात एकूण १८० तांब्याची व ८ चांदीची नाणी सापडली.
दुपारी सुमारे १ वाजता जेसीबी मशीनद्वारे काम सुरू असताना चालक अरुण भोई यांना तांब्याचा एक भटू दिसून आला. त्यांनी तत्काळ तो राम मंदिराचे मुख्य ट्रस्टी गोपाल अग्रवाल यांना दाखवला. अग्रवाल यांनी याबाबत तातडीने तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
सूचना मिळताच तहसीलदार डॉ. देवरे, ट्रेझरर एच. जे. बोरुडे, एपीआय चंद्रसिंग पालकर, सर्कल अधिकारी निशिकांत माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून संबंधित नाणी अधिकृत ताब्यात घेतली. प्रारंभिक अंदाजानुसार, तांब्याचे नाणे सुमारे २० ग्रॅम व चांदीचे नाणे सुमारे १० ग्रॅम वजनाचे असावे, असे सांगण्यात येत आहे.
या प्रसंगी मंदिर संस्थांचे विश्वस्त अॅड. दत्ता महाजन, कल्पेश अग्रवाल यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सापडलेली नाणी कोणत्या कालखंडातील आहेत, याचा शोध घेण्यासाठी ती पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे.