महा पोलीस न्यूज इम्पॅक्ट : ‘त्या’ वॉटरपार्कचे सर्व बॅनर हटवले, मनपा दाखल करणार गुन्हा?

महा पोलीस न्यूज | २१ मे २०२४ | जळगाव शहरात झुलेलाल वॉटर पार्क रिसॉर्टतर्फे अनेक ठिकाणी विना परवानगी बॅनर लावण्यात आले होते. महा पोलीस न्यूजतर्फे याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आल्यानंतर मनपा प्रशासनाने लागलीच सर्व फलक हटवले आहेत. तसेच यासंदर्भात योग्य ती दंडात्मक कारवाई आणि आवश्यकता भासल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक पल्लवी भागवत – जंगम यांनी सांगितले.
जळगाव शहरापासून काही अंतरावर झुलेलाल वॉटर पार्क रिसॉर्ट आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वॉटर पार्कला ऑफर देखील सुरु आहे. ऑफर संदर्भातील अनेक बॅनर जळगाव शहर मनपा हद्दीत अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता संबंधित वॉटर पार्क मालकांनी बॅनरच्या परवानगीसाठी अर्ज केलेला असून पोलीस प्रशासनाची नाहरकत परवानगी घेण्यास त्यांना सुचविले असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. परवानगी मिळणे बाकी असतानाच शहरात बॅनर लावण्यात आले होते.
शहरातील सर्व बॅनर हटवले
जळगाव शहरात अनेक ठिकाणी आणि विशेषतः सिग्नल यंत्रणेच्या खांबाला देखील बॅनर लावण्यात आले होते. महा पोलीस न्यूजच्या वृत्तानंतर शहरातील सर्व बॅनर हटवण्यात आले आहेत. शहरात बॅनर लावण्यासाठी वॉटर पार्ककडून दि.१७ रोजी अर्ज देण्यात आला आहे. परवानगी मिळण्याअगोदरच शहरात लावण्यात आलेले फलक काढण्यासाठी मनपा प्रशासनाने पथक पाठवले आहे. संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाची देखील परवानगी नाही
झुलेलाल वॉटर पार्कतर्फे जळगाव शहरात बॅनर लावण्यासाठी मनपा प्रशासनाला अर्ज देण्यात आला होता. मनपाकडून पोलीस प्रशासनाची परवानगी घेण्याचे सांगण्यात आले होते. वॉटर पार्क प्रशासनाने शहर वाहतूक शाखेकडे कोणताही अर्ज केला नसल्याची माहिती निरीक्षक देविदास इंगोले यांनी दिली आहे.