धक्कादायक : पोलीस ठाण्यातच निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःवर झाडली गोळी
पोलीस प्रशासन हादरले, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

महा पोलीस न्यूज | २० फेब्रुवारी २०२४ | नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अशोक नजन (वय-४०) यांनी स्वत:च्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. कॅबिनमधून आवाज येताच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता घडलेला प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक तसेच गुन्हे शाखेचे उपयुक्त प्रशांत बच्छाव यांनी अंबड पोलिस ठाणे गाठले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
शहरालगतच असलेल्या अंबड पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांचा तपास केला जातो. गेल्या वर्षभरापासून दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन हे त्याठिकाणी कार्यरत होते. मंगळवारी दिवसपाळीसाठी ते नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता पोलीस ठाण्यात आले. हजेरी लावल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले. त्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. स्वत:च्या पिस्तुलातून त्यांनी डोक्यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली.
कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नजन यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याची स्पष्टता झालेली नाही. अतिशय शांत व संयमी स्वभाव असलेले अशोक नजन यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांनी आपल्या कामातून सहकाऱ्यांवर चांगला वचक निर्माण केला होता, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे ते नातेवाईक होते.