रावेर पोलिसांकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात; १५० ग्रामस्थांना अन्नाचे वाटप

रावेर पोलिसांकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात; १५० ग्रामस्थांना अन्नाचे वाटप
रावेर, रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहीरवाडी गावात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांना रावेर पोलिसांनी मदतीचा हात देत सुमारे १४० ते १५० पुरग्रस्तांना जेवणाचे वाटप केले.
दिनांक २४ जून २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोजे अहीरवाडी गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. गावातील नाल्याकाठी राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक २८ जून रोजी अहीरवाडी येथे पूरबाधित ग्रामस्थांसाठी अन्नवाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सुमारे १४० ते १५० ग्रामस्थांना जेवणाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस हवालदार सुनील वंजारी आणि पोलीस शिपाई तथागत सपकाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांच्या प्रेरणेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिसांनी हा उपक्रम राबविला. या मदतकार्याबद्दल पुरग्रस्त ग्रामस्थांनी रावेर पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.






