रांजणगाव शिवारात बिबट्याला कैद करण्यासाठी दहा ट्रॅप कॅमेरे , चार पिंजरे

चाळीसगाव प्रतिनिधी :-तालुक्यातील रांजणगाव शिवारात लिंबूच्या बागेत खेळणाऱ्या एका चार वर्षाच्या चिमुकलीवर दबक्या पावलाने हल्ला करून बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. वन विभागातर्फे या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात दहा ट्रॅप कॅमेरे लावले असून वन विभाग चे कर्मचारी बिबट्याला कैद करण्यासाठी चार पिंजरे लावण्यात आले आहेत. दरम्यान मयत मुलीच्या कुटुंबीयांना मदतीचा प्रस्ताव वन विभागाकडून पाठवण्यात आला आहे.
दोन जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम करणाऱ्या काजा उर्फ काशीराम पावरा याची चार वर्षाची मुलगी रसला खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला ठार केल्याची घटना घडली होती.
घटनेनंतर उपवनसंरक्षक प्रवीण ए., सहायक वनसंरक्षक अमोल पंडित, परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रस्ताव सादर केला. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला मंजुरी मिळाल्यानंतर मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांचे एक पथक वनपरिक्षेत्रात बिबट्यावर नजर ठेवून आहे.