Detection

घरफोडी करणारी टोळी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात, ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव, बुलडाणा आणि मध्य प्रदेशातून आरोपी ताब्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीला गेलेली रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा तब्बल ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील शिरसोली येथील फिर्यादी राजेंद्र दौलत आंबाडकर हे ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घराबाहेरगावी गेले होते. ते ५ मे रोजी सकाळी ९ वाजता परतल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध माहिती तसेच तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी निष्पन्न झाले.

मध्य प्रदेश, बुलडाणा आणि भुसावळातून आरोपी ताब्यात
या प्रकरणातील संशयित आरोपी मुन्ना शहा सुलतान शहा (वय २२, रा. होळकापूर पोलीस चौकी, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेण्यात आले. दुसरा संशयित आरोपी मुस्तकीन ऊर्फ जुनेद भिकन शहा (वय २३, रा. बिस्मिल्ला चौकी, तांबापुरा, जळगाव; हल्ली रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) याला बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी धाड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तिसरा संशयित आरोपी जाबीर शहा जावेद शहा (वय २०, रा. मुस्लिम कॉलनी, बडी खानजवळ, भुसावळ, जि. जळगाव) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.

सोन्याचे दागिने, रोकड आणि मोटारसायकल हस्तगत
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुस्तकीन ऊर्फ जुनेद शहा याच्यावर यापूर्वी रामानंद, पाळधी, भुसावळ, जिल्हापेठ आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील १०,००० रुपये रोकड, सोन्याचे दागिने मोटारसायकल अशाप्रकारे एकूण ६,६८,७९० रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
संपूर्ण कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे, योगेश घुगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button