युवारंग युवक महोत्सवात सामाजिक संदेश देणाऱ्या सादरीकरणांचा जल्लोष

युवारंग युवक महोत्सवात सामाजिक संदेश देणाऱ्या सादरीकरणांचा जल्लोष
जळगाव | प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजातील वास्तवावर प्रकाश टाकत सामाजिक संदेश देणारी सादरीकरणे सादर केली.
रंगमंच क्रमांक १ बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात सादर करण्यात आलेल्या प्रहसन या कलाप्रकारात पुरग्रस्त गावातील परिस्थिती, प्रेमविवाहामुळे निर्माण झालेला कौटुंबिक कलह, मुक्त संवादाचे महत्त्व, वर्तमान राजकीय स्थिती, शासनाच्या अपुऱ्या योजना, बारगळलेला विकास, तसेच सोशल मीडियाचे दुष्परिणाम आणि समाजव्यवस्थेचे भिषण वास्तव अशा विविध सामाजिक विषयांना विद्यार्थी कलाकारांनी प्रभावीपणे हात घातला.
एकूण २६ महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. सर्जनशील वेशभूषा, पारंपारिक संगीत आणि कल्पक संवादांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पाश्चिमात्य समूहगान स्पर्धा पार पडली. क्लॅप बॉक्स, गिटारसारख्या आधुनिक वाद्यांच्या साथीने १० संघांनी दमदार सादरीकरण केले. तर कवी प्रदीप सभागृहात “२१ व्या शतकातील भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे का?” या विषयावर वादविवाद स्पर्धा रंगली. ६२ विद्यार्थ्यांनी अनुकूल व प्रतिकूल बाजू मांडत विचारांची जुगलबंदी सादर केली.
कवी प्रेम धवन सभागृहात चिकट कला (कोलाज) स्पर्धेत ४८ विद्यार्थ्यांनी निसर्गचित्र, स्थिरचित्र व व्यक्तिचित्र या विषयांवर सुंदर कलाकृती साकारल्या. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात भारतीय शास्त्रीय गायन (एकल) स्पर्धेत १० विद्यार्थ्यांनी सहभागी होत सुरेल सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध केले.
महोत्सवाच्या संपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. भोजन व निवास व्यवस्थेच्या उत्तम सोयींमुळे स्पर्धकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
या प्रसंगी युवारंगचे स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष अॅड. नितीन झाल्टे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. संदिप नेरकर, प्रा. मंदा गावीत, स्वप्नाली काळे, दिपक पाटील, ऋषिकेश चित्तम, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ. संजय शेखावत, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे व डॉ. प्रमोद तायडे, केसीईचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, तसेच रंगकर्मी हेमंत पाटील यांनी विविध रंगमंचांवर भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
संपूर्ण दिवस सादरीकरणांचा जल्लोष, सृजनशीलतेचा उत्सव आणि तरुणाईच्या उमेदीने युवारंग युवक महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला.






