Politics

बोदवडमध्ये गिरीश महाजनांची निर्णायक खेळी, अरविंद देशमुख ठरले ‘ट्रबलशूटर’

बोदवडमध्ये गिरीश महाजनांची निर्णायक खेळी, अरविंद देशमुख ठरले ‘ट्रबलशूटर’

जळगाव I प्रतिनिधी I जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांतील वाटाघाटींवर नामदार गिरीश महाजन यांची छाप दिसून आली. त्यात बोदवडची जागा भाजपकडे राहावी, यासाठी ते सुरुवातीपासून आग्रही होते. या मतदारसंघातून भाजपचे मधुकर रामचंद्र राणे, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक गोपाल बाबुराव गंगतीरे आणि रुपेश दामोदर गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गंगतीरे आणि गांधी या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मधुकर राणे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.

बोदवडच्या जागेबाबत चर्चा सुरू असतानाच सोमवारी रात्री गंगतीरे १५ मतदारांना सहलीवर घेऊन गेल्याची माहिती भाजपच्या गोटात पोहोचली. त्यामुळे बोदवडमधील मतांचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली. त्याच रात्री उशिरा महाजन यांनी आपले विश्वासू सहकारी अरविंद देशमुख यांच्यावर बोदवडमधील मतदारांशी संपर्क साधण्याची आणि त्यांचा समन्वय करण्याची जबाबदारी सोपवली.

देशमुख यांनी रातोरात मतदारांशी संपर्क साधला आणि बोदवडहून २२ मतदारांना जळगावला आणले. एकूण ३७ मतदार असलेल्या या मतदारसंघात बहुमतासाठी १९ मतांची गरज होती. त्या संख्येपेक्षा तीन मतदार अधिक सोबत आल्याने राणे यांच्या बाजूला बळ मिळाले. ऐन वेळी सूत्रे हाती घेऊन देशमुख यांनी महाजनांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे बोदवडच्या या घडामोडीत ते महाजनांचे ‘ट्रबलशूटर’ ठरले.

अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात महाजन यांनी स्वतः वाटाघाटींची सूत्रे हाती घेतली. अखेर गोपाल गंगतीरे आणि रुपेश गांधी या दोघांनीही माघार घेतली. रातोरात साधलेला मतदारांचा समन्वय आणि शेवटच्या टप्प्यात महाजनांनी केलेल्या वाटाघाटी यामुळे बोदवडमधील चुरशीला पूर्णविराम मिळाला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button