दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध; राष्ट्रीय जनमंच पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध; राष्ट्रीय जनमंच पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
चाळीसगावात आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी
चाळीसगाव | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे जनहिताच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने चाळीसगाव येथे आंदोलन करण्यात आले. यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत या घटनेबाबत निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
निवेदनात शांततापूर्ण आंदोलन करणे हा भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस बळाचा वापर झाल्याचा उल्लेख करत या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी व्हावी, जखमी विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय मदत व न्याय मिळावा, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने संवाद साधून निर्णय घ्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय भविष्यात शांततापूर्ण आंदोलनांवर अशा प्रकारची कारवाई होणार नाही, याबाबत केंद्र सरकारने हमी द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
पक्षाने निवेदनात म्हटले आहे की, मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास जळगाव जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या निवासस्थानांसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ, महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, ज्येष्ठ नेते गणेश राठोड, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, कायदेशीर सल्लागार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोरे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश वेलीस, युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आबा सोनार, बांधकाम कामगार आघाडीचे तालुका प्रमुख अमोल पाटील, भालेराव पाटील, चाळीसगाव शहर युवक आघाडीचे अध्यक्ष अधिकार पाटोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






