आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन
जळगाव, दि. १ ऑगस्ट : कोणतीही आपत्ती झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच त्यानंतर निर्माण होणारी परिस्थितीही तितक्याच सक्षमपणे हाताळावी लागते, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे आज यांनी सांगितले.
पूरानंतर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते किंवा पाणी दूषित झाल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छ पिण्याचे पाणी वापरावे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
ड्राय रेशनच्या व्यवस्थेसाठी सेवाभावी संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्पदंश, श्वान दंश व विंचूदंशाच्या घटना लक्षात घेऊन आवश्यक औषधांचा साठा सर्व ठिकाणी उपलब्ध करण्यात आला असून यासाठी संबंधित कर्मचारी कार्यरत आहेत.







