Crime

रावेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर धाड; ६०० किलो गोमांस जप्त, एकाला अटक तर एक फरार

रावेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर धाड; ६०० किलो गोमांस जप्त, एकाला अटक तर एक फरार

तीन जिवंत गोवंशांची गोशाळेत रवानगी; रावेर गुन्हे शोध पथकाची आभोडा येथे धडक कारवाई

 

रावेर प्रतिनिधी

तालुक्यातील आभोडा येथे अवैधपणे गोमांस विक्री करणाऱ्यांवर रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सकाळी धाड टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत ६०० किलो संशयित गोमांस, कत्तलीची हत्यारे जप्त करण्यात आली असून, कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून, एक संशयित फरार झाला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सकाळी आभोडा येथील बसस्टँड परिसरात पहिली धाड टाकली. तेथे उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा) हा राहत्या घरात दोन गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्रीच्या तयारीत असताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे ३०० किलो संशयित गोमांस, कुऱ्हाड व सुरे जप्त करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत मांसाचे नमुने घेऊन उर्वरित मांसाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.

गल्लीबोळाचा फायदा घेत एक जण पसार

त्यानंतर पथकाने आभोडा येथील चावडी भागात दुसरी धाड टाकली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच इरफान रहेमान उर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा गल्लीबोळाचा फायदा घेऊन पसार झाला. त्याच्या घरातूनही ३०० किलो संशयित गोमांस व हत्यारे जप्त करण्यात आली.

तीन गोवंशांना जीवनदान

फरार आरोपीचा शोध घेत असताना पथकाला आठवडे बाजाराजवळ कत्तलीसाठी बांधून ठेवलेले २७ हजार रुपये किमतीचे ३ गोवंश आढळले. पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांची रवानगी पुढील संगोपनासाठी गोशाळेत केली.

पोलीस शिपाई विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत शिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन व गुन्हे शोध पथकाने केली. अवैध कत्तलखान्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button