Other

उद्या संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा

उद्या संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा

टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळा; दुपारी ३ वाजता पांझरा पोळ चौकातून होणार प्रारंभ

जळगाव : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ तसेच शहरातील संयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शरदराव बिरारी व समाजाध्यक्ष विवेक जगताप यांनी ही माहिती दिली.

दुपारी ३ वाजता भव्य पालखी सोहळा

संत नामदेव महाराजांची भव्य पालखी मिरवणूक दुपारी ३ वाजता पांझरा पोळ चौक येथील शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक सभागृहातून निघणार आहे. पालखी मारुती पेठ, रथ चौक, सराफ बाजार, सुभाष चौक, चित्रा चौक, गुरुद्वारा चौक मार्गे मार्गक्रमण करीत सायंकाळी ६ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, बीएसएनएलजवळ येथे पोहोचेल. याठिकाणी पालखी सोहळ्याचा समारोप होऊन समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला व बालिकांचे विशेष पथक

पालखी सोहळ्यात महिला भगिनी व लहान मुलींचे विशेष पथक सहभागी होणार असून, टाळ-मृदुंगाचा गजर, सजीव देखावे आणि संतांची मांदियाळी हे या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कार्यकर्त्यांकडून सोहळ्याची तयारी सुरू असून, जळगाव शहरातील सुमारे १२०० समाजबांधवांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांचे परिश्रम

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, गणेश सोनवणे, शाखाध्यक्ष निलेश जगताप, सुनील सोनवणे, सुनील गांगुर्डे, महेश शिंपी, केतन मेटकर, आनंद शिंपी, भरत सोनवणे, देविदास शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी, महिला अध्यक्ष माधुरी शिंपी, शाखा समन्वयक प्रमोद निकुंभ यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

अर्धा दिवस दुकाने बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन

“सर्व शिवणकाम करणाऱ्या बांधवांनी व दुकानदारांनी अर्धा दिवस आपली दुकाने बंद ठेवून पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन समाजाध्यक्ष विवेक जगताप यांनी केले आहे. यंदा पालखी सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, दुपारी ३ वाजताच पालखी निघणार आहे, याची सर्व समाजबांधवांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button