सुनिता टिकारे यांच्या मधुर सुरांनी मैफिल जिंकली

सुनिता टिकारे यांच्या मधुर सुरांनी मैफिल जिंकली
जळगाव… सुर संगम संगीत मंच व जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन तर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित सुनिता टिकारे यांच्या शास्त्रीय व सुगम गायनाने जळगावकर रसिक सुखावले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने केली. मैफिलीची सुरुवात राग यमन मधील विलंबित ख्यालाने झाली. शब्द होते “मोमन लगन लागी” तर छोट्या ख्यालाचे शब्द होते ” एरी आली पिया बिना.” गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या संस्काराने आणि गायकीने तयार झालेले ते एक समृद्ध गायन होते.
आलाप, बोल आलाप, ताना यांनी संपन्न असा यमन झाल्यावर सुनिता ताईंनी राग जोग सादर केला “साजन मोरे घर आये” या अध्दा तीन ताल मधील बंदिशीनंतर
तराण्याने विशेष रंगत भरली. उत्तरार्धात त्यांनी सुगम संगीत सादर केले ज्यात भावगीत भक्ती गीते गझल यांनी रसिकांची मने जिंकली.
सुनिता टिकारे यांना संवादिनीवर मनोज गुरव,तबल्यावर तेजस मराठे,टाळवर प्रवीण महाजन, पखवाजवर उमेश सूर्यवंशी, तानपुऱ्यावर मयुरी हरीमकर व रेणुका जोशी यांनी साथ संगत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले.तर मैफिलीचे अभ्यासपूर्ण निवेदन संपदा छापेकर यांनी केले. कलाकारांचा परिचय क्षितिजा देशपांडे यांनी करून दिला.तर आभार प्रदर्शन दिव्या चौधरी हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर संगीत मंचच्या प्रवीण गगडाणी, नितीन बापट, पियुष रावळ, दुष्यन्त जोशी, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रसाद जोशी, विशाल भावसार, विशाखा देशमुख, सतीश शर्मा, विनय काबरा, धनंजय खडके, नंदू पाटील, प्रल्हाद चौधरी, भागवत पाटील, निळकंठ कासार, विद्या भंगाळे, संपदा छापेकर यांनी विशेष मेहनत घेतली. गंधे सभागृहातील या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.