Social

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांसोबतच पुरुषांचाही सहभाग वाढवावा –  करिश्मा नायर

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांसोबतच पुरुषांचाही सहभाग वाढवावा –  करिश्मा नायर

पूर्व प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा; ‘नवचेतना’ व ‘आधारशिला : मैत्री बालमनाशी’ उपक्रमांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न

जळगाव/प्रतिनिधी  :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘नवचेतना’ व ‘आधारशिला : मैत्री बालमनाशी’ या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या प्रशिक्षणात जिल्हाभरातील महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी बालकांच्या संगोपन व विकासामध्ये महिलांबरोबरच पुरुषांचाही समान सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने बालकांच्या जडणघडणीत सक्रिय भूमिका बजावल्यास या उपक्रमाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षणाचा उद्देश जन्म ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास साधणे हा असून, जन्म ते तीन वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘नवचेतना’ आराखडा आणि तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘आधारशिला : मैत्री बालमनाशी’ अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पालक, समुदाय, अंगणवाडी आणि शाळा यांचा समन्वय साधून बालकांचा जन्मापासून शाळेत प्रवेश होईपर्यंतचा प्रवास सुरक्षित, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला आहे. तसेच ‘माता गट’, ‘बालसखी’ आणि ‘मेळावे’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून अंगणवाडीतून शाळेत जाणाऱ्या बालकांना आवश्यक भावनिक व शैक्षणिक आधार उपलब्ध करून देण्याची संकल्पना प्रशिक्षणात उलगडून सांगण्यात आली.

नंदुरबार, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता त्याची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) हेमंतराव भदाणे यांनी पूर्व प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या आयुष्याचा मजबूत पाया असल्याचे सांगत अंगणवाडी स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षण व विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सोनाली पाटील आणि सुनंदा गावित यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button