गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च
संवेदनशील भागांत पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ९ अधिकारी, ९५ अंमलदारांसह ११८ होमगार्ड सहभागी
अमळनेर : गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून बुधवारी रूट मार्च काढण्यात आला. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत शहरातील विविध संवेदनशील भागांत हा रूट मार्च घेण्यात आला.
अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळचे अशोक नखाते आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, तिरंगा चौक, पवन चौक, मंगलादेवी चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डीपी, वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक तसेच गांधलीपुरा पोलिस चौकी परिसरातून रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये ९ अधिकारी, ९५ पोलिस अंमलदार, एक आरसीपी, एक स्ट्रायकिंग पथक आणि ११८ होमगार्ड सहभागी झाले होते. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.







