OtherSocial

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; जिल्हाधिकारी यांच्याकडून दुजोरा!

रावेर, भुसावळ, वरणगावसह जळगाव शहरात जाणवले हादरे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात आज सकाळी सुमारे ९.१५ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रावेर, भुसावळ, वरणगाव तालुक्यासह जळगाव शहरातही हे धक्के जाणवले. दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अचानक घरांना हादरे जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. जवळपास अर्धा मिनिट हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे अनेक नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली.

प्रामुख्याने भुसावळ आणि वरणगाव परिसरात भूकंपाचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवल्याचे समजते. याशिवाय रावेर परिसरासह जळगाव शहरातील काही भागांतही नागरिकांना हादरे जाणवले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दुजोरा
या घटनेबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात जाणवलेल्या हादऱ्यांच्या वृत्ताला अधिकृत पुष्टी मिळाली आहे. मात्र, भूकंपाची नेमकी तीव्रता, केंद्रबिंदू आणि इतर तांत्रिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

दरम्यान, धक्के जाणवल्यानंतर नागरिक एकमेकांना फोन करून याबाबत विचारणा करत असून नेमके काय घडले, याबाबत चर्चा सुरू आहे. प्रशासनाकडून पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button